Nashik News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. तरी देखील कृषी सेवा केंद्र संचालकांनी विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे व कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी दिली.
कृषीमंत्र्यांचा दणका
दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी सेवा केंद्राकडून खते बी-बियाणे खरेदी करताना फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे. या स्पर्श कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यांना दणका देत जिल्ह्यातील 31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांनी खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांची फसवणूक टाळण्याकरीता तसेच खतासाठी व बियाण्यांसाठी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कडक कारवाईचे आदेश कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक
जिल्ह्यात ठिकठिकाणी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरूवात झाली असून बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशातच जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामाच्या आधीच कृषी विभागाने सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांना शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना मागणीनुसार खतांची विक्री करावी, त्यासाठी इतर उत्पादने घेण्याचे बंधन करू नये, खतांची विक्री ई पॉस मशिनच्या माध्यमातून करावी, विक्री व शिल्लक साठी यांची नोंद ठेवावी, अशा सूचना दिल्या होत्या.
गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून दुकानांची तपासणी
दरम्यान या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने याबाबत दुकानांची तपासणी केली असता ई पॉस मशिनवरील नोंदीनुसार शिल्लक साठा व प्रत्यक्ष गुदामातील साठा याचा ताळमेळ नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे दुकानाबाहेर साठा व भावफलक न लिहिणे, खते, औषधे विक्रीनंतर शेतकऱ्यांना पक्के बील न देणे, युरियाची विक्री केवळ अधिक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच करणे आदी अनियमितता आढळून आली.
31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित
जिल्हा कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, अभिजित घुमरे जिल्हा भरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करीत आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात 31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून त्यात 18 खते विक्रेते, 6 बियाणे विक्रेते व 7 किटकनाशक विक्रेते असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.