Nashik Crime : नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिकमध्ये धडक कारवाई केली आहे. दुबईमधून (Dubai) सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केलेल्या 33 टन सुपारीची तस्करी नाशिक विमानतळाच्या (Nashik Airport) बाजूलाच असलेल्या जानोरी येथील ड्रायपोर्टवर नागपूर सीमा शुल्क विभागाच्या (Nagpur) पथकाने उघडकीस आणली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी असून बाजारात सुपारीची किंमत सहा कोटीहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


नाशिक (Nashik) शहरातून अनेक मोठ्या शहरांसह राज्यात जाणारे महामार्ग असल्याने अनेकदा नाशिक जिल्ह्याच्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा आदी भागातून तस्करी होत असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस देखील विशेष मोहीम राबवत आहे. अशातच नागपूरच्या सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई नाशिक शहराजवळ केली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


नागपूर सीमा शुल्क विभागाला या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. पडताळणीसाठी त्यांनी ड्रायपोर्टवर सहा कंटेनरची तपासणी केल्यानंतर तस्करीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीके इंटरप्राईजेस चे संचालक आणि मुख्य सूत्रधार प्रथमेश विजय काटकर या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दुबई येथील जुबेर अली यांच्या नावाने हे कंटेनर बुक करण्यात येत होते. तपासणी तस्करी केलेली 33 टन सुपारी जप्त करण्यात आली. या सुपारीचे बाजारमूल्य तब्बल 2 कोटी 48 लाख रुपये असून दंड आकारणीसह त्याची एकूण किंमत 6 कोटी 41 लाख रुपये असल्याचे पथकाने सांगितले. दोन कोटी 48 लाख रुपयांच्या या सुपारीवर सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदीनुसार दंड आकारणी करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मुंबई, नाशिकमधील गोदामांवर छापे


नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिक शहराजवळील जानोरी एअरपोर्टवर कारवाई केली. या कारवाईत खजुराच्या नावाखाली सुपारी तस्करी करण्यात येत होती. या सुपारी तस्करीप्रकरणी अटकेतील व्यापारी काटकर यांच्या मुंबई व नाशिक येथील गोदाम व कार्यालयांवर छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे नागपूर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 


विमानाच्या टॉयलेटमध्ये लपवले सातशे ग्रॅम सोने


दरम्यान नागपूर शुल्क विभागाने याच सुमारास दुसरी कारवाई केली आहे. गो एअरच्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरच्या सीमाशुल्क विभागाचे आयुक्त अभय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विमानतळाचे सहाय्यक आयुक्त अविनाश पांडे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला. यात विमान प्रवाशांना थांबवून पथकाने त्यातील दोन संशयितांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून विमानाच्या टॉयलेटमधून सोने जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.