Nashik Ramnavami : नाशिकच्या (Nashik News) काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) रामनवमीनंतरच्या एकादशीला श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेच्या परंपरा आहे. यानुसार आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळाराम मंदिर पूर्व येथे मानकरी समीरबुवा पुरी हस्ते पूजनानंतर रथ ओढण्यास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनांसह नाशिक पोलिसांची जय्यत तयारी झाली आहे. 


दरम्यान, नाशिककरांच्या (Nashik) श्रद्धेचा, जल्लोषाचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम (Ram Rath) आणि गरुड रथाच्या मिरवणुकीची अनोखी परंपरा आहे. जवळपास अडीचशे वर्षांहून अधिक दोन्ही रथ नाड्याने ओढले जातात. रथयात्रेपूर्वी राममंदिरातून मूर्ती व पादुकांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. यात रामरथ भोगमूर्ती आणि गरुड रथात (Garud Rath) रामाच्या पादुका आरतीने स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे असलेल्या मानकरी वर्ग रामरथाच्या प्रारंभीचा नारळ फोडेल. त्यानंतर दोन्ही रथांची बुवांच्या हस्ते आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरवात होईल. 


रथ मिरवणूक मार्ग


सुरवातीला गरुड रथ आणि त्यापाठोपाठ रामरथ ओढण्यास सुरवात होईल. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथ यात्रा ढीकलेनगर, नागचौक, चार हत्ती पूल, काट्यामारुती चौक, जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने पुढे आयुर्वेद महाविद्यालय समोरून गौरी पटांगणापर्यंत काढण्यात येईल. रामाचा रच नदी ओलांडत नसल्याने रामरथ म्हसोबा महाराज पटांगणावर उभा केला जाईल. तर गरुडरथ रोकडोबा, बोहरपट्टी, मेनरोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर कपूरथळा परिसरातून येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला जाईल.


नाशिक पोलिसांची जय्यत तयारी 


राज्यातील राजकीय-सामाजिक तणावस्थितीमुळे पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेला अलर्ट' देत रथोत्सवासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आज, नाशिकमध्ये निघणाऱ्या रथोत्सवासाठी आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांसह एक हजार अंमलदारांचा बंदोबस्त नेमला आहे. यासह राज्य सुरक्षा दलाची (एसआरपीएफ) तुकडी, दंगल नियंत्रण पथक आणि इतर सर्व पथक रथोत्सवात तैनात राहणार आहेत. रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत रथोत्सवाला आयुक्तालयाचे पोलीस प्रशासन तैनात असणार आहे. श्रीराम नवमीनंतर एकादशीनिमित्त आज, रविवारी श्री. काळाराम मंदिरापासून रामरथ आणि गरुडरथ मार्गस्थ होणार आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव आणि चंद्रकांत खांडवी यांनी परिमंडळ एक आणि दोनसह गुन्हे शाखेच्या पथकांना त्यासंदर्भात आदेश दिले आहेत.


असा असणार नाशिक पोलिसांचा फौजफाटा 


दरम्यान, आजच्या रथ यात्रेसाठी गर्दी लक्षात घेऊन नाशिक पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह इतर तुकड्यांचा बंदोबस्त असणार आहे. यात पोलीस आयुक्तांसह तीन पोलीस उपायुक्त सहभागी असणार आहेत. त्याचबरोबर आठ सहायक आयुक्त, 20 पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, 250 पोलीस अधिकारी, 300 होमगार्ड, हजाराहून अधिक अंमलदार उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखांसह गुन्हे युनिट 1 आणि 2, मध्यवर्ती गुन्हे, दरोडा विरोधी, अंमली पदार्थ विरोधी, गुंडा विरोधी, खंडणी विरोधी पथकांसह राज्य सुरक्षा दलाचे तीन पथक, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, विशेष शाखा, वाहतूक शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.