Nashik Simantini Kokate : नाशिकच्या (Nashik) राजकीय वर्तुळातून राजकीय तापमान वाढविणारी बातमी समोर आली असून राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे (Simantini Kokate) यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. शहरातील त्र्यंबक नाका परिसरात सीमंतिनी कोकाटे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्षाकडून जोरदार तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) निवडणुकीबाबतही अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार यात शंका नाही. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या बॅनरवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे छायाचित्र असल्याने अधिकच चर्चा रंगू लागली आहे.
सीमंतिनी कोकाटे या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या आहेत. त्याचबरोबर त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. तर सीमंतिनी कोकाटे यांना घरातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गमतीशीररित्या माणिकराव कोकाटे हे मंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. परंतु आम्ही त्यांना खासदार करण्याच्या तयारीत आहोत असं देखील म्हटलं होत. माणिकराव कोकाटे यांनी दिलेले एका मुलाखतीत देखील लोकसभा नव्हे तर विधानसभा ठीक आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे आता सीमंतिनी कोकाटे या नाशिक लोकसभामधून तयारी करतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीच्या तरुण उमेदवार?
सीमंतिनी कोकाटे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लावले असून त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सीमांतनी कोकाटे उमेदवार असू शकतात का? अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे हे खासदार आहेत. हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडी नाशिक लोकसभा मतदासंघात नवीन उमेदवार देते की काय असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे.
राष्ट्रवादीकडे जागा जाण्याची शक्यता
दरम्यान 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकी वेळी भाजपा शिवसेना युतीत नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळाली. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीला मिळालेली होती. त्यामुळे ही जागा आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभामध्ये राष्ट्रवादीकडे सध्या दोन विधानसभा आहेत तर एक काँग्रेसकडे आहे. तीन विधानसभा भाजपकडे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपात नाशिक लोकसभा राष्ट्रवादीकडे येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये एका विधानसभेचे नेतृत्व सीमांतनी कोकाटे यांचे वडील माणिकराव कोकाटे करीत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, शिंदे गटाकडून अविष्कार भुसे, सध्याचे खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख असलेले विजय करंजकर यांच्या नावाची देखील चर्चा केली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून आता सीमंतिनी कोकाटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीला आली आणि त्यात जर ही जागा युवा नेतृत्व, नवीन चेहरा आणि महिला म्हणून सीमंतिनी कोकाटे यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे कोकाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर ठाकरे गटाला आणि भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो.