Sanjay Raut : राज्यात रंगलेल्या सत्तानाट्याचा उत्तरार्ध सुरु झालेला असतानाच नव्या समीकरणांवरून तसेच पहाटेच्या शपथविधीचे साक्षीदार असलेले अजितदादा पवार अचानक यांचे नाॅट रिचेबल त्यानंतर त्यांनी अपचन झाल्याचे सांगणे तसेच पीएम मोदींच्या कौतुकाने भलतीच चर्चा रंगली आहे. भाजपकडून आता राष्ट्रवादी फोडण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. यासर्व चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून केलेल्या दाव्यावरून पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी फोडण्याचा सीझन-2 आल्याचा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर नेमकी कोणती चर्चा झाली? यावरूनही भाष्य केले आहे.
पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही
संजय राऊत रोखठोक सदरात म्हणतात, एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेईमानांचे सरदार झाले. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले.
ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत
ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, 'आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!' शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस 'सागर' बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात 'वर्षा'सह तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे.
अजित पवार यांनीच खुलासा करायला हवा
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा श्री. अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात श्री. पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.
इतर महत्वाच्या बातम्या