Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी (Crime) नित्याची झाली आहे. चोरी, लूटमार, घरफोडी आदी घटना वारंवार घडत आहेत. अनेकदा सीसीटीव्ही असूनही चोरीच्या घटना घडत आहेत. अशातच बँकेत चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरी (Theft) झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिकमध्ये (Nashik) चोरीचे प्रकार वाढले असून चोरीच्या घटनांची संबंधित पोलीस स्टेशनला (Nashik Police) नोंद होते, मात्र चोरी उघडकीस येण्यास बराच अवधी लागतो. तर कधी गेलेली वस्तू मिळणे दुरापास्त होऊन जाते. अशावेळी पोलीस सीसीटीव्ही वैगरे किंवा तत्सम पुराव्यांचा आधार घेऊन चोरट्यांचा शोध घेतात. मात्र अनेकदा चोरटे. पोलिसांना सीसीटीव्हीला (CCTV) न जुमानता सर्रास चोरी करण्याचे धाडस करतात. आता नाशिकमध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय झाल्याचे चित्र एका घटनेवरून समोर आले आहे. ही घटनाही एका अंबड परिसरातील बँकेत घडली आहे.
नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत एका बँकेत चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमधून उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांचे डोळे देखील हा चोरीचा प्रकार पाहून विस्फारले आहेत. शहरात महिला चोरांची टोळी कार्यरत असल्याची बाब समोर आली असून बँकेत व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे झाले आहे. या घटनेत बँकेत एक ग्राहक पैसे जमा करण्यासाठी आलेला होता. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना सहीसाठी बोलवले. हा ग्राहक जसा सही करण्यासाठी गेला. त्याचक्षणी त्याच्याबाजूला बसलेल्या व काही वेळापासून त्याचे निरीक्षण करत असलेल्या एका महिलेने 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
चोरीचा नवा प्रकार ....
दरम्यान संबंधित महिला बँकेत चोरी करण्यात पटाईत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या शेजारी महिला बसून राहतात. ग्राहक सही करण्यासाठी किंवा काही कारणासाठी उठताच हातचलाखीने रोकड काढून घेतात. त्यामुळे नाशिकमध्ये बँकेत पैसे भरतांना काळजी घ्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या महिला कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. बँकेत सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही असताना याची कुठलीही भीती न बाळगता महिला चोरी करत असल्याचे समोर आल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा धास्तावले आहे.