Nashik Gudhipadawa : एकीकडे संप मिटल्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक भागात कृषी विभागाकडून (Agriculture) नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अद्यापही जैसे थे परिस्थिती असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच आज गुढीपाडवा सणाच्या दिवशी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतातच गुढी (Gudhipadwa) उभारून शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार असा सरकारकडे केला आहे. 


कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे कालच रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील चांदवड, निफाड तालुक्यातील (Niphad) काही गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त भागात ओझरती भेट देत निव्वळ कागदोपत्री दौरा केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. काही भागातच कृषी अधिकारी पंचनामे करत असून आमच्याकडे कधी होणार पंचनामे आणि कधी मदत मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आज सगळीकडे गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात केला जात आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिल्लारे या तरुण शेतकऱ्याने अक्षरशः आपल्या कांद्याच्या शेतात गुढीला कांद्याची माळ, द्राक्ष, मिरच्यांच्या माळा घालत सरकारचा निषेध केला आहे. 


येवला तालुक्यातील (Yeola) वैभव खिल्लारे (Vaibhav Khillare) या तरुण शेतकऱ्याने 'कांद्याचा केला शेतकऱ्याने वांधा' अशा आशयाचे फलक लावत अनोखी गुढी उभारली आहे. कांद्याला हमीभाव द्या, पावसाने पीक झाले उद्ध्वस्त, शेतमालाला भाव द्या असे अनोखे फलक गुढीला लावत या शेतकऱ्याने आपल्या शेतात गुढी उभारत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी खिल्लारे म्हणाले कि, आज कांद्याला भाव नाही, बटाट्याला भाव, कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही. मायबाप सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरघोष मदत करावी. आजच्या दिवशी लोक घरावर गुढी उभारतात, मात्र आज मी शेतात गुढी उभारून सरकारला शेतमालाला योग्य भाव देण्याची विंनती केल्याचे ते म्हणाले. 


तर यावेळी खिल्लारे यांच्या आई संगीता खिल्लारे म्हणाल्या कि, शेतकऱ्यांनी वर्षभर राबून शेती करत असतो. मात्र आजच्या घडीला शेतीच्या कोणत्याच पिकाला भाव नाही. काय करायचं शेतकऱ्याने? सरकारने आमची चेष्टा केली असून अवघे साडे तीनशे रुपये अनुदान दिले आहे. एवढा सगळा खर्च करून, एवढी मेहनत घेऊन काहीच उपयोग नाही? तेव्हा शेतकऱ्याने नेमकं काय करायचं? आज घराघरात गुढीपाडव्यानिमित्त गोडधोड केले जात आहे. मात्र आज शेतकऱ्याच्या घरात काहीच नाही? त्यामुळे आम्ही आज शेतातच गुढी उभारली आहे. सरकारने शेतकऱ्याच्या पिकास योग्य भाव देण्याची मागणी या शेतकरी महिलेने केले आहे.