Nashik hanuman Birth Place : नाशिक (Nashik) येथील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळ (Hanuman Birth Place) वाद आता राज्य-केंद्र सरकार सोबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी असून भविष्यात याबाबत कुठलाही वाद होऊ नये, यासाठी आता साधू महंत, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांची स्वतंत्र ग्रामपंचायत घेऊन त्यातील ठराव केंद्र आणि राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अंजनेरी येथे आयोजित बैठकीत देण्यात आली.
नाशिकरोडच्या शास्रार्थ सभेनंतर गोविदानंद महाराज गुजरातला रवाना झाले. यानंतर अंजनेरी ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा करण्यात हनुमान मंदिरात बैठक आयोजित केली होती. यावेळी हनुमान जन्मस्थळाबाबत आपला विजय झाला असल्याचे साधू महंतांनी सांगितले. शिवाय यापुढे हनुमान जन्मस्थळाबाबत कोणताही वाद उद्भवू नये यासाठी अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असा एकमुखी निर्णय अंजनेरी येथे आयोजित बैठकीत करण्यात आला. साधू महंत, अंजनेरी ग्रामस्थ त्याचबरोबर परिसरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
दरम्यान यावेळी भक्तिचरण दास म्हणाले कि, आमच्या धार्मिक स्थळांबाबत कोणीही अपशब्द वापरू नये, चुकीचे अर्थ किंवा इतिहासाची मोडतोड करून महत्त्व कमी करू नये, कुणी करत असेल तर त्याला आम्ही सर्व मिळून विरोध करू, आमच्यात अंतर्गत वाद असला तरी धार्मिक स्थळांसाठी आम्ही एकत्र येऊन लढा देऊ असे त्यांनी सांगितले.
गडावर भव्य मंदिर उभारणार
अंजनेरी गडावर जेथे हनुमानाचे जन्मस्थळ आहे. या ठिकाणी अकरा फुटी धर्मध्वज उभारणार आहोत. तसेच गडावर देशातील सर्वात भव्य असे हनुमान मंदिर उभारत असल्याचे अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने राजाराम चव्हाण यांनी सांगितले.
अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु भविष्यात वाद होऊ नये म्हणून आम्ही पुरावे एकत्र न्यायालयातून अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे कायमस्वरूपी अधिकृत करून असल्याचे स्वामी सोमेश्वेरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.