Nashik News : नाशिक शहरातील मास्टर मॉलला लागलेली आग तीस तासानंतर आटोक्यात आली. यावेळी आग विझवण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे विनापरवानगी वापर तसेच विनापरवानगी इमारत उभी केल्याप्रकरणी संबंधितांना नोटीस देऊन थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शालिमार चौकालगत असलेल्या गंजमाळ परिसरात तीन मजली इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तूंच्या मास्टर मॉलला रविवारी (19 जून) आग लागली होती. ही आग तीन दिवसानंतर आटोक्यात आली. अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी ही व्यवसायिक इमारत कशी उभी राहिली, त्याचप्रमाणे अशा किती व्यावसायिक इमारती शहरात आहेत, ज्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी तसेच रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाडीला जाण्यासाठीही मार्ग नाही, याचा शोध आता महापालिका प्रशासन घेणार आहे. तसेच कायद्यानुसार ज्या इमारती तयार करण्यात आलेल्या नाही, त्यांना नोटीस देऊन कारवाई होणार आहे.


दरम्यान गंजमाळ येथील मास्टर मॉलला लागलेल्या आगीची महापालिकेकडून चौकशी करण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समितीचे नेमण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन मास्टर मॉल इमारतीची पाहणी केली.


मास्टर मॉलला रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली होती तर सुमारे 30 तासांनंतर ती आग आटोक्यात आली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर आणि इमारतीच्या समोरील भिंत तोडण्याचे आदेश दिल्यानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली होती.
 
अशा इमारतींची चौकशी
नाशिक शहरात अनेक भागात मास्टर मॉलप्रमाणे दाटीवाटीच्या क्षेत्रात इमारती उभ्या आहेत. आता मास्टर मॉलच्या घटनेवेळी अग्निशामक दलाच्या वाहनांना जाण्यासाठी देखील जागा नव्हती. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील सर्व धोकादायक, दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक इमारतींची चौकशी करण्याचे ठरवले आहे.


अशी आहे समिती
नाशिक शहरातील दाटीवाटीच्या क्षेत्रात उभारलेल्या इमारतींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपायुक्त करुणा डहाळे, नगरचना विभागाचे संजय अग्रवाल, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा समिती समावेश असल्याचे समजते. 


संबंधितांवर गुन्हा दाखल
नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मास्टर मॉल आगीच्या घटनेची चौकशीसाठी समिती गठित केली आहे. या अंतर्गत समितीने पाहणी केल्यानंतर या ठिकाणी विनापरवानगी वापर तसेच विनापरवानगी इमारत उभी केल्याप्रकरणी संबंधितांना नोटीस देऊन थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.