Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे यासह वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी ग्रामीण पोलीस सरसावले असून त्यासाठी विशेष विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील मोहपाडे- अस्ताने रस्त्यावरील मोहपाडे शिवारातील गुरुनानक श्रीचंद भगवान मंदिर ट्रस्टच्या शेतातील गट नं. ३ मध्ये तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे २४ लाख रुपये किंमतीचा पाऊणे पाचशे किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयिताचा शोध सुरु आहे. मालेगाव तालुका भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री व साठवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी गांजाच्या तब्बल १७ गोण्या जप्त केल्या. या प्रकरणी महेशमुनी उदासीन व काळू शिरसाठ या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अस्लम शेख इस्माईल उर्फ अस्लम गांजावाला हा मुख्य संशयित फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. किल्ला पोलिस शहरातील एका गुन्ह्यात संशयितांचा शोध घेत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. तालुका पोलिसांना त्यांनी ही माहिती दिल्यानंतर श्री. पाटील व सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांना कारवाईत सफेद रंगाच्या गोणीत चौकोणी ठोकळे असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आला. सफेद रंगाच्या गोणीत खाकी चिकटपट्टीच्या मदतीने हे ठोकळे चिटकविण्यात आले होते. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर श्री. खाडवी, श्री. जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. अस्लम गांजावाला याने त्याच्या मालकीचा हा गांजा महेशमुनी व काळू यांच्याकडे विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई केल्यानंतर गांजाची मोजणी केली. मोजणी व खात्री केली. बुधवारी पहाटे या प्रकरणी पोलिस नाईक किशोर नेरकर यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुध्द अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ लाखांचा गुटखा जप्त
कळवण तालुक्यात 13 लाखांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी सागर उत्तमराव सातपुते (कनाशी, कळवण) याला अटक केली आहे कळवण तालुक्यातील अभोणा येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर कारवाई केली बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार वाहन तपासण्यात आले कुमसाडी गावाजवळ धनोली ते कनाशी रस्त्यावर वाहन अडवण्यात आले. यावेळी अवैधरित्या गुटका वाहतूक करणाऱ्या संशयित सातपुतेला अटक झाली असून त्या माध्यमातून गुजरात कनेक्शनचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यासाठी पोलीस पथक गुजरातला रवाना झाले आहे.