सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
Manikrao Kokate vs Uday Sangle : विधानसभा निवडणुकीआधीच सिन्नरचे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांनी गंभीर आरोप केलाय.

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असून दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावेदेखील समोर येत आहेत. त्यातच आता नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील (Sinnar Assembly Constituency) मतदार याद्यांमध्ये (Voter List) घोळ झाल्याची माहिती मिळत असून यामुळे सिन्नरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी दबाव टाकून आपला प्रभाव नसणाऱ्या गावातील मतदारांची नावे मयत आणि स्थलांतरित दाखवून नावे वगळल्याचा आरोप इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांनी केला आहे. यामुळे आता सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
उदय सांगळे यांनी म्हटले आहे की, हयात असणाऱ्या मतदाराला यादीत मयत दाखवण्यात आले आहे. तब्बल 42 गावातील हजारो लोकांची मतदार यादीत स्थलांतरित उल्लेखाची नोंद करण्यात आली आहे. तर नाम साधर्म्यचा फायदा घेत बनावट अर्ज सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर बोगस नावाने अर्ज दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील उदय सांगळे यांनी केली आहे.
सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार
ज्यांच्या नावाने आक्षेप घेणारे अर्ज सादर केले आणि ज्यांना मयत अथवा स्थलांतरित दाखवण्यात आले त्यांनाच याबाबतीत माहिती नसल्याचा दावा देखील उदय सांगळे यांनी केला आहे. तर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मतदारांमध्ये गावागावात वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. सिन्नर तहसील कार्यालयावर लवकरच मोर्चा काढला जाणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
आपला काहीच संबंध नाही : माणिकराव कोकाटे
तर मतदार यादीत कोणाचे नाव असावे कोणाचे नाही ही पूर्णपणे प्रशासकीय बाब आहे. आपला याच्याशी काहीच संबंध नाही, असा खुलासा आमदार माणिकराव कोकाटे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. आता विधानसभा निवडणुकीआधीच माणिकराव कोकाटे आणि उदय सांगळे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे. यामुळे सिन्नरचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला
...तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवणार; अजितदादांच्या आमदाराचे महायुतीला खडेबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
