Shirdi Saibaba Mandir : शिर्डी साईबाबा संस्थांनच्या (Shirdi Saibaba Mandir) वतीने आयोजित केलेल्या साईबाबा गुरुपौर्णिमा (Gurupaurnima) उत्सवास सुरुवात झाली असून तब्बल सहा लाख लाडूंचे (Prasad Ladu) वाटप केलं जातं आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासनाकडून 24 मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या फुलांच्या सजावटीमुळे आणि विद्युत रोषणाईने भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. 


शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (Saiababa Mandir) गुरु पौर्णिमेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी एक लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर आज लाखो भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे काकड आरती झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे 4 लाख भाविक शिर्डीत (Shirdi) दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या एक दिवस अगोदर शनिवार पासूनच भाविकांनी शिर्डीत दाखल व्हायला सुरुवात केली. शनिवारच्या दिवशी सुमारे 70 हजार भाविकांनी दर्शन घेतले. तर उत्सवाच्या पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. 


दरवर्षीच्या तुलनेत यात यंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टॉलमध्ये वाढ करण्यात आली. याशिवाय भाविकांसाठी भक्त निवासात लॉकरची सुविधाही यंदापासून सुरू करण्यात आली. साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. साई मंदिर आणि परिसर विविध फुलांनी सजवण्यात येणार असून विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शिर्डीत वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात येणार असल्याने भाविकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागणार नाही. साई प्रसादालयही भाविकांसाठी सज्ज करण्यात आले. नाष्टा पाकिटे आणि लाडू प्रसाद, बुंदी प्रसाद पाकिटांचीही निर्मिती करण्यात आली. 


प्रसादालयात भाविकांना जेवणाची सुविधा 


दरम्यान, शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवासाठी 6 लाख प्रसाद लाडू तयार करण्यात आले आहे. तसेच गुरुपौर्णिमेसाठी मंदिर परिसरात संस्थानने भाविकांसाठी चहा स्टॉलची उभारणी केली आहे. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे भाविकांना जेवणाची सुविधा करण्यात आली आहे. त्यानुसार 2 जुलै रोजी मूगडाळ शिरा, हरभरा किंवा डांगर भाजी, बटाटा-वांगी असा मेन्यू आहे. तर आज 3 जुलै रोजी जिलेबी, मटकी, वांगी- बटाटा किंवा कोबी बटाटा किंवा भाजी, डाळ-भात, चपाती किंवा डांगर भाजी, डाळ-भात, चपाती असा मेन्यू आहे. तर उद्या 4 जुलै रोजी बुंदी, वाटाणे, वांगी, डाळ-भात, चपाती असा मेन्यू असणार आहे. त्याचबरोबर भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासनाकडून 24 मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.