Minister Anil Patil : 2014 च्या निवडणुकीत भाजपकडून (BJP) अनिल पाटील (Anil Patil) यांनी निवडणूक लढवली, मात्र मोदी लाट असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करत 2019 च्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणली होती. अजित पवार समर्थक असलेल्या अनिल पाटील हे पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना अचानक मंत्रिपदाची लाॅटरी लागली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद लाभले आहे.
अनिल पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यातील रहिवासी आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड-डांगरी गटातून ते प्रथम भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. अनिल पाटील यांनी अमळनेर बाजार समिती सभापती पदावर दहा वर्ष राजकारण केले. त्यांनतर जिल्हा बँक संचालक म्हणून 15 वर्ष कार्यरत होते. जळगाव दूध संघाच्या संचालक पदावर 5 वर्ष होते. तसेच जळगाव जिल्हा परिषद सदस्य म्हणून 10 वर्ष काम पाहिले आहे. सुरुवातीला ते भाजप पक्षात होते. 2014 ला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र मोदी लाट असतानाही अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे पाटील यांचा पराभव करुन निवडून आले होते. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय संपादन केला. त्यानंतर आणि पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून कार्यरत आहेत.
2019 च्या निवडणुकीत विजय
अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे अमळनेर मतदारसंघातून (Amalner Assembly) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेवर निवडून गेले. याशिवाय अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या अमळनेर मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील समाजाने चांगला प्रतिसाद दिला होता, अशी चर्चा निवडणुकीनंतर समोर आली होती. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर अनिल भाईदास पाटील हे नाव संपूर्ण खान्देशात पोहोचलं होतं. याशिवाय अमळनेरात लोकपयोगी कामांसाठी ते पुढाकार घेत असल्याची चर्चा असते.
अजित दादांसोबत मंत्री पदाची शपथ
अनिल पाटील हे अजित पवार (ajit Pawar)यांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत. पहाटेच्या शपथविधीच्या वेळीही अनिल पाटील हे अजित पवारांसोबत होते. यानंतरच्या कालखंडातही ते अजितदादांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जात आहेत. विशेष म्हणजे, अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. त्यातच पहिल्यांदाच आमदार झालेल्या अनिल पाटील यांना अचानक मंत्रिपदाची लाॅटरी लागली असे म्हणावे लागेल. अजित पवार यांच्यासोबत अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे जळगाव जिल्ह्यास आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यानंतर तिसरे मंत्री लाभले आहेत.