Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज लता दीदींच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. नाशिकच्या पवित्र रामकुंडात लता दिदींच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं आहे. हृदयनाथ मंगेशकरांचे पुत्र आदिनाथ मंगेशकरांच्या हस्ते अस्थी विसर्जन करण्यात आलं. यावेळी नाशिकमध्ये उषा मंगेशकरांसह मंगेशकर कुटुंबातील इतरही सदस्य उपस्थित होते. याशिवाय शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि लता दिदींचे चाहते मोठ्या संख्येने हजर होते.
लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर यांनी एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "माझी बहिण नाही, माझी आई होती ती. तिच्या अस्थी येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत. उत्तमरित्या, उत्तम मुहूर्तावर, फार चांगली पूजा पार पडली. यावेळी सगळ्यांनी मनापासून आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे."
अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी
लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवजीपार्कवर गर्दी उसळली होती. चाहत्यांनी लता दीदींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांसह राजकीय नेते आणि कलाकारही शिवाजी पार्कवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, विद्या बालन, आमिर खान, रणबीर कपूर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, जावेद अख्तर, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप पळसे पाटील, शाहरुख खान, श्रद्धा कपूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पियुष गोयल, अनिल देसाई यांच्यासह अनेक दिग्गजांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारतामधील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.