नाशिक : देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करून सुरू केलेली किसान रेल्वे (Kisan Railway) मागील पाच महिन्यापासून बंद आहे.  कोळशाच्या तुटवड्याचे कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आली आहे. रेल्वे बंद झाल्यानं  कोट्यवधी रुपयांची उलाढाल  ठप्प झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा नवी बाजारपेठ मिळावी या हेतून रेल्वे मंत्रालयाने  8 ऑगस्ट 2020 देवळाली रेल्वे स्थानकातून पहिली किसान रेल्वे सुरु केली होती. नाशिकसह आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यात कमी खर्चात, कमी वेळात पुरवठा करणारी रेल्वे सुरु झाल्याने आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. सुरवातीच्या काळात मिळालेल्या प्रतिसादानंतर आठवड्यातून एक दिवस धावणारी रेल्वे पुढे चार दिवस सुरु करण्याचा निर्णय झाला. 


दिवसाला नभुसावळ वैभागातून साधारणतः 500 टन मालाची वाहतूक केली जात होती. वाहतुकीच्या भाड्यापोटी रेल्वेला 20 लाख रुपयाचे भाडेही दररोज मिळत होते. 20 महिने शेतकरी व्यापाऱ्यांच्या प्रतिसादामुळे रेल्वे धावत होती मात्र अचानक रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि 13 एप्रिल 2022 पासून आजपर्यंत शेतमालाची वाहतूक करणारी रेल्वे सेवा ठप्प आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात मार्च एप्रिल महिन्यात राज्यात देशात कोळशाचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी कोळसा वाहतूक आणि इतर कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आल्याचा आरोप नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलाय. आतामात्र कोळसा तुटवडा जाणवत नाही कुठेही ओरड नाही तरीही रेल्वे सुरु होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली  आहे.


किसान रेल्वे नाशिकच्या देवळालीपासून बिहारच्या पटनापर्यंत जात होती तिथून आजुबाजूंच्या शहरात नाशिकसह महाराष्ट्रातील शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत होती. किसान ट्रेन आठवड्यातून चार दिवस देवळालीतून सुटत होती. 22 बोग्यांपैकी देवळालीला आठ, नाशिकरोडला चार, लासलागावला दोव, मनमाडला आठ राखीव होत्या. एक बोगीतून 24 टन माल जातो. एका किलोला 2.20 पैसे भाडे आहे. असे 50 हजार भाडे एका बोगीचे होते. उर्वरीत 50 हजार केंद्राचे अनुदान असते. त्यामुळे शेतक-याला फायदा व्हायचा. आता प्रवाशी गाडीतून माल पाठविण्यासाठी किलोला 6.50 रुपये भाडे मोजावे लागतात. त्यातही माल जाण्याची शास्वती नाही. किसान रेल्वेमधून दिवसाला अडीचशे पाचशे टन माल जातो तेथे प्रवाशी गाडीतून पंधरा टनच माल जातो. त्यामुले शासनाचा महसूलही बुडाला आणि  शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. 


 राज्यातून भाजीपाला, कांदा, द्राक्षे, डाळिंब, संत्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. रस्ता मार्गाने वाहतूक करता किलोमागे 10 ते 12 रुपये लागायचे.  रेल्वेमुळे तोच खर्च अवघ्या चार रुपयावर आला होता त्यात दोन रुपये अनुदानही मिळत होते. म्हणजे प्रत्यक्षात शेतकऱ्याला किलोमागे दोन रुपये खर्च येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रेल्वे वरदान ठरली होती. शेतीमाल नाशवंत असल्यानं कमी वेळात कमी खर्चात बाजार पेठ उपलब्ध होत असल्यानं शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होत होत होती. मात्र आता बाजर भाव पडले आहेत. कांद्यासह इतर भाजीपाला शेतात खराब होत असल्याने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे.


तीन दिवसापूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकला आले होते. त्यावेळी नाशिकच्या खासदारांनी किसान रेल्वे सुरु करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अद्याप काहीच पावलं टाकली नाहीत. मुळात कोळसा तुटवडा, कोळसा वाहतूक आणि किसान रेल्वे बंद करण्याचा सबंध तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.  त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही त्यामुळे पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली ही ड्रीम रेल्वे पुन्हा कधी धावणार असा सवाल उपस्थित होत आहे.