Ramdas Athawale : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) व एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वादात शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. मात्र शिवसेना वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली असून खरी शिवसेना शिंदे यांची आहे, बरी शिवसेना उध्दव ठाकरे यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवले. शिवाय शिंदे- फडणवीस यांची जोडी चांगले काम करत असल्याचे विधान रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.
रिपाई नेते रामदास आठवले हे नाशिकमध्ये (Nashik) होते. नाशिकच्या विश्राम ग्रहावर असताना त्यानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात नव्याने आलेले शिंदे सरकारचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले कि, शिवसेना वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली आहे, खरी शिवसेना शिंदे यांची आहे, बरी शिवसेना उध्दव ठाकरे यांची आहे. मात्र यांच्या वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवले. या दोघांची जोडी चांगले काम करत आहेत. शिवाय खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाकडून होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
आठवले यांनी यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचे विधान केले. ते पुढे म्हणाले राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचे उत्पन्न आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यानंतरची लढाई सर्वोच्च न्यायालयात असून तेथे न्याय मिळेल. तसेच मराठा आरक्षणासाठी केंद्रा कडून काही मदत होते का त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत पडलेल्या फुटी विषयी ते म्हणाले कि, अशीच फूट रिपाई मध्ये झाली होती. गवई, कवाडे आणि मी वेगवेगळ्या बाजूला गेलो. गवईकडे दोन खासदार असल्याने पक्षचिन्ह त्यांना मिळाले बाकी सर्व पक्ष माझ्या बाजूला होता. त्यामुळे या प्रकरणातही शिंदे यांच्या बाजूने बहुमत असल्याने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे देखील शिंदे यांच्याकडे राहील, असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
भाजप हे मित्रपक्ष संपवत हे खरं नाही!
दरम्यान रामदास आठवले यांनी यावेळी नितीशकुमार यांच्या सरकारवर स्थापनेवर बोलले. ते म्हणाले कि, नितीशकुमार आधी लालू सोबत होते, नंतर मोदी सोबत गेले आता पुन्हा मोदी सोबत येतील. नितीशकुमार यांचे बिहार मधील सरकार फार काळ टिकणार नाही. नितीश कुमार भाजप सोडून गेल्याने एनडीए ला काही फरक पडणार नाही. त्यांनी धोका दिला तर त्यांचे आमदार फुटून परत येतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार चेहरा नाही. त्याचबरोबर मोदींच्या समोर, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, सोनिया गांधी, शरद पवार कुठलेच चेहरे चालणारनाही. शिवाय भाजप मित्र पक्ष संपवत हे खरं नाही, माझा पक्ष वाढतोय, मला तसा अनुभव आला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
वंदे मातरमला विरोध करण्याची गरज नाही !
यावेळी रामदास आठवले म्हणाले कि, मी मोदींच्या पाठिशी असून त्यांना घाबरण्याचे कारण नाही. तसेच रिपाईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक पक्षात येण्यासाठी प्रयत्न करतो आहे, निवडणुकांवेळी आम्हाला इतरांची मते मिळत नाही, पण आम्ही ज्यांना पाठिंबा देतो ते निवडून येतात. तसेच रिपाईला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अपघातासंदर्भात म्हणाले कि मेटे कुटुंबीयांनी अपघाताच्या चौकशीची मागणी केली असून ती चौकशी झाली पाहिजे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना फोनवर वंदे मातरम म्हणण्यास सांगितले आहे. याविषयी ते म्हणाले कि, वंदे मातरम म्हणण्याचा निर्णय चांगला आहे, त्याला विरोध करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.