Dindori loksabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दिंडोरीतून माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
जे पी गावित यांनी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता जे पी गावित यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज जाहीर सभा घेत त्यांना शरद पवारांना उमेदवार बदला नाहीतर उमेदवाराला पाडू असा इशारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
दिंडोरीची जागा माकपला द्यावी
महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना बदला. इंडिया आघाडीने ही जागा माकपला द्यावी. नाहीतर तुमचा उमेदवार पडणारच, असा इशारा त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिला आहे. महाविकास आघाडी असो किंवा माकपने उमेदवारी दिली नाही तरी अपक्ष लढण्यावर जे पी गावीत ठाम आहेत. दिंडोरीत जाहीर सभा घेत जे पी गावित यांनी महाविकास आघाडी विरोधात एल्गार पुकारला आहे. या सभेला शेतकरी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे पी गावितांचा भाजपवर निशाणा
द्राक्ष विकले व्यापारी पळून गेला. सरकार काहीच करू शकत नाही. येवल्याचा व्यापारी माझ्याकडे आला होता. मी हस्तक्षेप केला. केरळच्या व्यापाऱ्याने फसवणूक केली होती. मी पैसे मिळवून दिले. देशाच्या लोकशाहीची निवडणूक होत आहे. 400 पारचा नारा भाजप देत आहे. त्यांना संविधान बदलायचे आहे. त्यासाठी त्यांना 400 पार करायचे आहे. 10 वर्षात कायद्याचा गैरवापर करून दडपशाही निर्माण करण्यात आली आहे. सरकार जे करेल ते तुम्हाला मान्य करावे लागेल. शिवसेनेचे (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) दोन तुकडे केले. अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) दडपण आणले आणि त्यांना घेतले. भाजप 400 च्या वर गेले तर संविधान गुंडाळून फेकून देतील, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
शरद पवारांनी लक्षात ठेवावे नाहीतर...
हुकूमशाहीच्या दिशेने भाजप सरकार वाटचाल करत आहे. त्यासाठी आमच्यासारखे नेते संसदेत गेले पाहिजे. जे जातात ते तिथं जाऊन शांत बसतात. रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे. द्राक्ष आणि कांद्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. ही जागा इंडिया आघाडीने आम्हाला सोडावी, अशी मागणी अजूनही आहे. शरद पवारांनी लक्षात ठेवावे नाहीतर तुमचा उमेदवार पडतोच आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही मार्क्सवादी पक्षाचा उमेदवार नक्की निवडून आणू. पहिल्या सभेला 50 हजार लोक उपस्थित राहिले. मोदींच्या सभेला सुद्धा इतके लोक उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
जे पी गावितांचा भास्कर भगरेंना टोला
दिंडोरी लोकसभेची जागा नक्कीच जिंकू शकतो. अजून एक महिना बाकी आहे. 6 ते 7 लाख मत जमा करायला वेळ लागणार नाही. त्यांच्याकडे चार-पाच कार्यकर्ते सोडले तर कुणीही नाही, असा टोला यावेळी भास्कर भगरे यांचे नाव न घेता जे पी गावितांना लगावला.
आणखी वाचा