Nashik Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाशिक लोकसभा निवडणुकीच्या (Nashik Lok Sabha Constituency) माघारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. मात्र हेमंत गोडसे यांना आपल्याच पक्षातून आव्हान निर्माण झाले असून नाशिक शिवसेनेत दोन गट पडल्याचं बघायला मिळतंय.


शिवसेनेचे (Shiv Sena) नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मी स्वतः इच्छुक असणे चुकीचे नाही, असं म्हणत मी मुख्यमंत्र्यांकडे देखील इच्छा व्यक्त केल्याचं एबीपी माझाशी बोलतांना म्हंटलय. यासोबतच छगन भुजबळांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याचे वक्तव्य अजय बोरस्तेंनी करत माघार घेतल्याने छगन भुजबळांचे आभार मानले आहेत. 


छगन भुजबळांनी मनाचा मोठेपणा दाखवला - अजय बोरस्ते 


अजय बोरस्ते म्हणाले की, छगन भुजबळांचे मी आभार मानतो. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. महायुतीत किती पारदर्शकता, संवाद आहे हे त्यांनी आज दाखवले आहे. नाशिक हा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा आपल्याकडेच राहायला हवा, अशी आमची मागणी होती. आता निश्चितपणे ही जागा शिवसेनेकडेच राहणार आहे. 


मी देखील निवडणूक लढू शकतो - अजय बोरस्ते 


मी जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. महायुतीचा समन्वयक आहे. मी इच्छुक असणे चुकीचे नाही. लवकरच नाशिकच्या जागेचा तिढा आता सुटला पाहिजे. आता निवडणुकीसाठी खूप कमी दिवस शिल्लक राहिलेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की, विद्यमान हेमंत गोडसे आहेतच पण मी देखील उमेदवारी लढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


नाशिकमधून कुणाला संधी? 


दरम्यान, आता भुजबळांच्या माघारीनंतर नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता अधिकृतपणे नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार का? हेमंत गोडसे की अजय बोरस्ते? मुख्यमंत्री कोणाला संधी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


काय म्हणाले हेमंत गोडसे?


हेमंत गोडसे (Hemant Godse) म्हणाले की, अमित शाह यांनी नाव सुचवले असे भुजबळ म्हणाले. पण, एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने आणि वेळ कमी असल्याने भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा आता सुटला आहे. नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!