नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे प्रथमच शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. माजी आमदार मालोजीराव मोगल (Malojirao Mogal) यांच्या स्मृतिनिमित्त निफाड (Niphad) तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली होती. दिंडोरीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी शरद पवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत. शरद पवारांच्या पाठोपाठ आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) कुणी लोकप्रतिनिधी दिंडोरीत राहिलेला नव्हता. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) या शिक्षकाला मैदानात उतरवले. भास्कर भगरे यांनी भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांना पराभूत केल्याने ते जायंट किलर ठरले. आता शरद पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर दोन दिवसातच जयंत पाटील नाशिकमध्ये येणार असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
जयंत पाटील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार
आज जयंत पाटील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहे. यात जयंत पाटील इच्छुकांच्या मुलाखती घेत विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीची माहिती करून घेणार असल्याचे समजते. तसेच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशकात सहा आमदार
अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. यात येवल्यातून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिंडोरीतून नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), सिन्नरमधून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), देवळालीतून सरोज अहिरे (Saroj Ahire), निफाडमधून दिलीप बनकर (Dilip Bankar), कळवणमधून नितीन पवार (Nitin Pawar) यांचा समावेश आहे. आता शरद पवार गटाकडून अजितदादांच्या आमदारांविरोधात तगडे उमेदवार देण्याचा हालचाली सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आजचा जयंत पाटील यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या