नाशिक : सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात आहे. सरकार दुजाभाव करत असल्याची भावना माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर सरकारने आता कविता राऊत यांना सरकारी नोकरी (Government Job) देण्याचा निर्णय घेतला आहे.
कविता राऊत ही गेल्या 11 वर्षांपासून सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत होती. आता तिला सरकारी नोकरी मिळाली आहे. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कविता राऊत यांच्यासह आणखी 15 जणांना सरकारी नोकरी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
कविता राऊत यांनी केला होता सरकारवर आरोप
काही दिवसांपूर्वी कविता राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. आदिवासी असल्यामुळे जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. शासकीय धोरणाप्रमाणं नोकरीसाठी अनेकदा अर्ज देऊन देखील माझ्या अर्जांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचं आणि तिच्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे, असे कविता यांनी म्हटले होते.
मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
माझी ज्युनिअर खेळाडू ललिता बाबर यांनी माझ्याबरोबर पदवी प्राप्त केली. माझ्यापेक्षा कमी पदके असताना देखील गट 'अ' मध्ये त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र माझ्यासोबत जातीयवाद करून 11 वर्षांपासून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असेही कविता राऊत यांनी म्हटले होते. यानंतर आता सरकारने कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही कविता राऊत यांनी भारताला पदकं मिळवून दिली आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून तिनं सहभाग घेतला होता. तसेच कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणार अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कविता राऊतला ठाकरे सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर काहीतरी गडबड आहे : राज्यपाल कोश्यारी
Nashik News : नाशिकच्या खेळाडूंना मिळणार क्लास वन पोस्ट, 'ही' नाव चर्चेत, काय म्हणाले गिरीश महाजन?