नाशिक : शहर व परिसरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) सार्वजनिकरीत्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस असून येत्या सोमवारपर्यंत (दि.16) सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत शहर वाहतूक शाखेकडून शहरातील एकूण 12 मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) यांनी काढली आहे. 


नाशिक शहर व परिसरात गणेशोत्सव काळात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी व संभाव्य अपघाताच्या घटनांना निमंत्रण मिळू नये, या उद्देशाने वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदानावर होणारी गणेशभक्तांची जादा गर्दी लक्षात घेता या परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


शुक्रवारी वाहतूक मार्गात बदल


गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शुक्रवारी (दि. 13) सार्वजनिक व खासगी (घरगुती) गणरायाचे विसर्जन केले जाते. यानिमित्ताने छोटेखानी पद्धतीने शहरात विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. यानिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता शुक्रवारी पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ या भागात गर्दी उसळून वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेससह पंचवटी आगारातून सुटणाऱ्या महामंडळाच्या बसेस, जड मोटार वाहनांना दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरील मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे. सीबीएस- कडून पंचवटीकडे जाणाऱ्या सर्व बसेस व अन्य जड वाहने अशोक स्तंभापासून पुढे रविवारकारंजा व पंचवटी कारंजाकडे जाणार नाहीत.


या मार्गावरील वाहतूक बंद



  • अण्णा भाऊ साठे पुतळा चौफुलीकडून कालिदास कलामंदिराकडे जाणारा रस्ता (दुतर्फा) 

  • सीबीएस ते कान्हेरेवाडीमार्गे बी.डी. भालेकर मैदानासमोर येणारा रस्ता

  • सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल आणि शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा रस्ता.

  • खडकाळी सिग्नलकडून शालिमार कॉर्नरपर्यंतचा रस्ता.

  • नेहरू गार्डनपासून शिवाजी रोड ते गाडगे महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता.

  • मेनरोड व बादशाही कॉर्नर भद्रकालीकडे जाणारा रस्ता.

  • गाडगे महाराज पुतळा धुमाळ पॉइंट ते दहीपूलचा रस्ता. 

  • सीबीएस शालिमार व नेहरू उद्यानासमोरील सावानाकडे जाणारा रस्ता

  • मेहेर सिग्नल ते शालीमारकडे नेहरू उद्यानामार्गे येणारा रस्ता.

  • रेडक्रॉस सिग्नल ते धुमाळ पॉइंट रस्ता

  • अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा-मालेगाव स्टॅण्डपर्यंतचा रस्ता. 

  • रविवार कारंजाकडून रेडक्रॉस सिग्नल चौकाकडे येणारा रस्ता.


विसर्जनाच्या दिवशी पार्किंग स्थळे


गोल्फ क्लब मैदान, डोंगरे वसतिगृह मैदान (जुना गंगापूर नाका), गौरी पटांगण (गोदाकाठ), म्हसोबा पटांगण, साधुग्राम मैदान (तपोवन), निलगिरी बाग मैदान, संभाजी स्टेडियम (सिडको), पवननगर मैदान (सिडको), मराठा हायस्कूल पटांगण (गंगापूर रोड), शरदचंद्र पवार (पेठरोड), कवडे गार्डन (गंगापूर रोड) या ठिकाणी नागरिकांनी त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने गणेशोत्सव काळात व विसर्जनाच्या दिवशी उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.


पर्यायी मार्ग असे 



  • सारडा सर्कल - गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस- मेहेर सिग्नल - अशोक स्तंभ - रामवाडी मार्गे मालेगाव स्टँड - मखमलाबाद नाका - पेठनाका - दिंडोरी नाका मार्गे इतरत्र जातील.

  • मालेगाव स्टँडपर्यंत येणारी वाहतूक मखमलाबाद नाका - रामवाडी - जुना गंगापूर नाका मार्गे इतरत्र जातील.

  • मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालीदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याचे दुकान या मार्गावरील दुतर्फा वाहतूक सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नलमार्गे जाऊ शकेल.


आणखी वाचा 


नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?