Nashik News : आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाच नावलौकिक उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकार नोकरीमध्ये घेतलं जातं नाही. याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावरील उत्तरात नाशिकच्या (Nashik) खेळाडूंना नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करुन वर्ग 1 पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.


मुंबई विधानभवनात विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. या दरम्यान छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले (Chhagan Bhujbal) की, नाशिकचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत (Kavita Raut), दत्तू भोकनळ (Dattu Bhoknal) आणि अंजना ठमके या खेळाडूंनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कारने सन्मान देखील केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा सन 2020 मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झालेला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 


तर 1 मे, 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर शासन सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत. या शासन निर्णयातील वर्ग 1 पदासाठी आवश्यक असलेले निकष या तीन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, "महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणारे बहुतांश खेळाडू नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूंना थेट 'वर्ग 'अ' नियुक्ती देण्याचा शासन आदेश असूनही त्याकडे प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. खेळासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यानंतरही खेळाडूंची शासन दरबारी उपेक्षाच सुरु आहे."


म्हातारे झाल्यांनंतर नोकरी मिळणार का?


वयोमर्यादा संपल्यानंतर अर्थात म्हातारे झाल्यांनंतर शासकीय नोकरी मिळणार का? असा टाहो पात्र खेळाडूंकडून केला जात आहे. वारंवार चांगली कामगिरी करुनही, तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त करुनही असंख्य खेळाडू शासकीय नोकऱ्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावरील उत्तरात क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, 2018 पासून शासनाने नवीन क्रीडा धोरण आणले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करुन पात्र असलेल्या कविता राऊत आणि दत्तू भोकनळ यांना वर्ग 1 पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.