Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. कोटा पद्धतीमुळे निकाल यायला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. 


'अशी' होणार मतमोजणी 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. 


पहिल्याच फेरीत निकाल माझ्या बाजूने येणार : किशोर दराडे 


शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी म्हटले आहे की, शिक्षक बांधव माझ्यासोबत असल्याने निकालाची भीती नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने निवडणुकीत आरोप केले गेले. महायुतीचे नेते माझ्यासोबत होते त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. पहिल्याच फेरीत निकाल माझ्या बाजूने येणार असल्याचा विश्वास किशोर दराडे यांनी आहे. 


आपलाच विजय होणार : महेंद्र भावसार 


दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. शिक्षकांची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याने महेंद्र भावसार यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षकांना अनेक प्रलोभने या निवडणुकीत दिली गेली, मात्र सगळेच शिक्षक या प्रलोभनांना बळी पडले नाहीत, अनेकांनी जागृत राहून मतदान केले. अनेक शिक्षकांनी प्रामाणिक राहून गुणवत्तेच्या आधारावर मतदान केले आहे. संपूर्ण निवडणूक आपण गुणवत्तेच्या जोरावर लढली असून यामुळे इमानदार आणि प्रामाणिक शिक्षक आपल्या पाठीशी असून आपला विजय नक्की होईल, असा विश्वास महेंद्र भावसार यांनी व्यक्त केला. 


आणखी वाचा 


Nashik Teachers Constituency Election 2024 : मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर