Nashik Income Tax Raid:  नाशिकमध्ये (Nashik) सलग पाचव्या दिवशी आयकर विभागाकडून (Income Tax Raids) बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी सुरू आहे. सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. 20 एप्रिलला पहाटेच्या सुमारास नाशिकमध्ये एकाचवेळी पाचहून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे पडले होते आणि आज पाचव्या दिवशी देखील आयकर अधिकारी कर्मचारी व्यावसायिकांच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून अनेक बड्या नेत्यांसह बिल्डर्स, व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात येत आहे. अशातच नाशिकचे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. नाशिकमध्ये 15 हुन अधिक बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारी सकाळी छापे टाकण्यात आले. या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून पहिल्या दिवशी महात्मा गांधी रोड, कुलकर्णी गार्डन यांसह शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या 15 अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. त्यानंतर शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांची घरे, कार्यालये यांची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी आजही सुरु असल्याने सलग पाचवा दिवसही आयकर विभागाची छापेमारी सुरूच असल्याने नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांकडे घबाड असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


दरम्यान, नाशिक शहरात आयकर विभागाने ज्या बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकले आहेत. हे सर्वही नामांकित व्यावसायिक असून आयकर विभागाच्या विविध पथकांकडून त्यांची निवासस्थाने, कार्यालये तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी केली जाते आहे. बँक व्यवहार, ऑडिट रिपोर्ट आणि कागदपत्राची छाननी केली जाते आहे. नाशिकसह, संभाजीनगर, पुणे , मुंबई, नागपूर या ठिकाणाहून जवळपास 100 हून अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने ही कारवाई केली असून आयकरात तफावत असल्याचे जाणवल्याने छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.


बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ


आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते. त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान एप्रिल महिन्यात हे छापे पडल्याने आयकर चोरीचा संशय? अघोषित संपत्ती? की इतर काही कारणे आहेत. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागल असून या छापेमारीत आता काय समोर येतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.