Hijab Controversy : शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक पोशाख नको, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयानं केली असली तरी हिजाब प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. त्याआधी गुरुवारी मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आज हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. दुसरीकडे जालन्यातही काल मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. 


बुलढाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.


बुधवारी, 'जमियत उलेमा ए हिंद'च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. प्रत्येक धर्मात हवा तसा पोशाख घालण्याची मुभा आहे. मुस्लिम धर्मात महिला, तरुणी धर्मानुसार आचरण करीत आहे. मुस्लिम समाजात महिला, तरुणी पूर्ण कपडे घालून आपले शरीर झाकुन ठेवतात मग त्याला विरोध का असा प्रश्न मौलाना मुफ्ती यांनी उपस्थित केला. 


शुक्रवारी मालेगावमध्ये 'हिजाब दिन' पाळण्यात येणार असून सर्व महिला त्या दिवशी बुरखा परिधान करतील अशी माहिती त्यांनी दिली. हिजाब हा मुस्लिम समाजात ईबादत म्हणून पाहिले जाते. जर हिजाब काढण्यासाठी बळजबरी केले जात आहे. अशा प्रकारे बंधन घालणे चुकीचे असल्याचं मत इरफान नदवी या मौलनांनी व्यक्त केले आहे. 


कर्नाटकमधील हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत


हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha