Nashik Lok Sabha Constituency : गेल्या महिन्याभरापासून महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र काल (दि. 01) नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे हे सलग तिसऱ्यांदा नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आज नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी अजित गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये महायुतीकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. तसेच जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.
हेमंत गोडसेंचे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची 'महाविजय रॅली' काढण्यात आली आहे. या रॅलीला शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नाशिकच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला होता. मात्र नाशिकची जागा आपल्याकडेच ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले आहे. आता 2014, 2019 नंतर सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराजांना थांबण्याची आम्ही विनंती करणार असल्याचे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
नाशिकची निवडणूक ठरणार लक्षवेधी
दरम्यान, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर (Karan Gaikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकची निवडणूक राज्यभरात लक्षवेधी ठरणार आहे. आता नाशिकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या