Nashik Heat Wave : मार्च महिन्यातच नाशिक (Nashik News) जिल्ह्याचे तापमान 33 ते 35 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे  प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. त्यातच यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग सरसावला असून जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. नागरिकांनो, उन्हात जाण्याचे टाळा, उष्माघाताचे काही लक्षणे दिसत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 


उष्णतेत प्रचंड वाढ


याबाबत नांदगाव (Nandgaon) ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ख्याती तुसे यांच्या संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ऊन वाढल्याने उष्माघाताची लक्षणे नागरिकांमध्ये आढळू शकतात. उन्हामध्ये मजुरीचे कामे फार वेळ करणे, शारीरिक श्रमाचे काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने उष्माघाताचा सामना करावा लागू शकतो. 


उष्माघाताची लक्षणं काय? 


ताप येणे, शरीर शुष्क होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, शरीरास घाम सुटणे, थकवा येणे, त्वचा कोरडी पडणे, अस्वस्थ वाटणे, उलटी होणे, बेशुद्ध अवस्था, मानसिक बेचैन, तहान लागणे हे लक्षणं असतात. 


अशी घ्या काळजी


वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावी, काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हात जाण्याअगोदर पोटभर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नये, डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


जिल्ह्यातील 112 आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित


दरम्यान, उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


Nashik News : शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना