Gulabrao Patil नाशिक : जळगावच्या चाळीसगाव येथे तीन दिवसांपूर्वी अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे (Balu More) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एबीपी माझाला मोठी माहिती दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, मी जळगावचा पालकमंत्री आहे. चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांची हत्या व्यक्तिगत कारणावरून करण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ पकडण्यासाठी एसपींना आदेशित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महेंद्र मोरे उर्फ बाळू मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बाळू मोरे यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पाच हल्लेखोर आणि कट रचनारे दोन अशा एकूण सात हल्लेखोरांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. आता बाळू मोरे यांचा उपचार सुरू असताना निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात आले आहेत.
हल्लेखोरांचे वाहनात सापडले जिवंत काडतुसं
गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पाच पथक रवाना झाले असून या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतुसे, कोयता आणि इतर साहित्य आढळून आले आहे.
बारक्या कारणावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्य नाही - गुलाबराव पाटील
दरम्यान, उद्धव ठाकरेंची राष्ट्रपती राजवट लागू जरा अशी मागणी केली. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, ही मागणी चुकीची आहे, व्यक्तिगत वादावरून घटना घडल्या आहेत, जनतेत प्रक्षोभ होईल अशा नाहीत, बारक्या कारणावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी बरोबर नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा