Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी देखील जोर लावला आहे. त्यातच आज शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) एबीपी माझाशी बोलताना भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा लढायचे आणि जिंकायचे. विजय निश्चितच आमच्या बादली चिन्हाचा होणार आहे, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे. 


आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करतोय - गिरीश महाजन 


शांतीगिरी महाराजांच्या दाव्यावर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, असा कुठलाही विषय नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. आम्ही शांतिगिरी महाराज यांना विनंती केली होती की, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. कारण आपण एकच विचाराचे आहोत. महाराजांनी ऐकलं असतं तर त्याचा फायदा नाशिकच्या जागेसाठी झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.  


काय म्हणाले हेमंत गोडसे? 


शांतीगिरी महाराजांच्या दाव्यावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले की,  भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे. भाजप आमच्या सोबतच आहे. शांतीगिरी महाराज यानी काही वक्तव्य केले असले तरी त्यातून गैरसमज निर्माण होऊ नये. मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्यांचा  आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहे. छगन भुजबळही प्रचारात सक्रीय आहेत. त्यांचा पाठींबा मिळतोय. आमचा विजय 100 टक्के होणार आहे, असे त्यांनी सांगितले.


गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका


उध्दव ठाकरे यांनी संघावर केलेल्या वक्तव्यावरून गिरीश महाजनांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांच्या मागे जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे ते काही पण बोलतील त्यांना उत्तर देणं आमचं दायित्व नाही.  उद्धव ठाकरे यांना त्यांचा पराभव दिसतोय. त्यामुळे ते असे स्टेटमेंट करत आहे. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha : ऐन निवडणुकीतच नाशिकच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकल्याचा आरोप