Girish Mahajan : नाशिक लोकसभेचा (Nashik Lok Sabha Constituency) गुंता महायुतीत अद्याप सुटलेला नाही. नाशिकमधून महायुतीतून (Mahayuti) नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आज भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे अचानक नाशिक दौऱ्यावर दाखल झाले. गिरीश महाजनांनी आज नाशिकच्या महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी नाशिकच्या जागेचा निर्णय नेमका कधी होणार? याबाबत महत्वाचे भाष्य केले आहे. 


गिरीश महाजन म्हणाले की,  नाशिकमध्ये महायुतीची बैठक पार पडली. परंतु उमेदवार कोण याबाबत इथे चर्चा झालेली नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) घेतील. आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


नाव जाहीर नसले तरी आमची तयारी पूर्ण 


गिरीश महाजन पुढे म्हणाले की, दोन दिवस फॉर्म भरायला राहिले आहेत. नाव जरी जाहीर नसले तरी आमची तयारी पूर्ण झालेली आहे. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोन तारखेला शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उमेदवारीला उशीर झाला म्हणून काही फरक पडेल, असे वाटत नाही. आमची संपूर्ण टीम तयार आहे. महायुतीचा उमेदवार गेल्या वेळेस पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते 


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन आज छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की,  भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. कारण त्यांना नाशिकबाबत खडा अन् खडा माहीत आहे. आपण मैदानात तयार आहेत. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. 


नाशिकची जागा कोणाला मिळेल हे सांगणे कठीण 


लोकांच्या मनात मोदीजी आहेत. नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. दोन्ही जागा या आम्हीच जिंकू. मागच्या वेळी देखील उत्तर महाराष्ट्रातील 8 जागा जिंकलो होतो. यावेळी देखील आठही जागा जिंकू. एखादी जागा इकडे तिकडे होईल. आज हे सांगणे कठीण की नाशिकची जागा कोणाला मिळेल. आज किंवा उद्या याबाबत निर्णय होईल. वाटाघाटीमध्ये कोणती जागा कोणाला याबाबत चर्चा सुरू आहे. पाच ते सहा जागा अशा आहेत की कोणती जागा कोणाला मिळेल याबाबत चर्चा सुरू आहे. एकदिलाने महायुती काम करेल आणि दोन्ही जागा आम्ही जिंकू, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार हालचाली, महाजनांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर