Nashik News : नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, दोन गंभीर; २०२३ साली आजच्याच दिवशी घडलेल्या जिंदाल दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या
Gas Leakage : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे २०२३ साली झालेल्या जिंदाल दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Nashik News : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात सोमवारी गॅस गळतीमुळे (Gas Leakage) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. सिलेंडरची जोडणी करताना गॅस गळती (Gas Leakage) झाल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सर्वत्र नववर्षाचा आनंदोत्सव साजरा होत आहे. यातच नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली. इंदिरानगर (Indiranagar) परिसरात एका पार्सल पॉईंटवर सोमवारी (दि. 01 जानेवारी 2024) सकाळी गॅस गळतीमुळे अचानक भडका उडला. कलानगर चौकातील वक्रतुंड पार्सल पॉईंट येथे ही दुर्घटना घडली.
इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु केले अन् भडका उडाला
सकाळी पार्सल पॉईंटचे दुकान उघडल्यानंतर दोन व्यक्तींनी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु केले. त्यानंतर मोठा भडका उडाला. यानंतर दुकानात असलेले दोन जण बाहेर फेकले गेले. दुकानातील सामानदेखील यावेळी बाहेर फेकले गेले. यात दोन जण ५० ते ६० टक्के भाजले असल्याचे समजते.
...म्हणून भडका उडाला असावा
रात्रीच्या वेळी गॅस गळती झाली असावी, सकाळी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु करताच स्पार्क होऊन भडका उडाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्फोट होताच याठिकाणी मोठी आग भडकली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. यात दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी आजच्याच दिवशी जिंदालमध्ये अग्नितांडव
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2024 रोजी भीषण स्फोट झाला होता. जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यातील एस एस पी २ या प्लँटमध्ये बॉयलर हीट झाल्याने मोठा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू आणि २२ जण जखमी झाले होते. आजच्या इंदिरानगर परिसरात झालेल्या दुर्घटनेने जिंदाल दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
उत्तमनगरलाही झाला होता गॅस गळतीमुळे स्फोट
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी उत्तमनगर परिसरातील तुळजा निवास येथे भीषण स्फोट झाला होता. या घटनेत घरातील दोन पुरुष आणि एक महिला गंभीररित्या भाजले होते.हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडरच्या स्फोटासारखा आवाज होऊन परिसर हादरून गेला होता. स्फोट झालेल्या घराबाहेर काही अंतरावरील दोन चारचाकी वाहनांच्याही काचा फुटल्या होत्या तर घरात दोन मोबाईल (Mobile), परफ्युम बॉटल आणि ईतर कॉस्मेटिक साहित्य त्यांना जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते.
मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला असावा किंवा अल्कोहोलिक परफ्युमला आग लागल्याने ती भडकली असावी अशी परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी