Lok Sabha Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची (Dindori Lok Sabha Constituency) जागा राष्ट्रवादीकडे (NCP) घेण्याची मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत (Mumbai) आयोजित बैठकीत अजित पवारांकडे (Ajit Pawar) करण्यात आली आहे. या मतदारसंघात 4 आमदार हे अजित पवार गटाचे असल्याने राष्ट्रवादीचा या मतदार संघावर दावा आहे. 


सध्या येथे भाजपच्या खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या असून त्यांचा पत्ता आता कट होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. गेल्या लोकसभेवेळी भारती पवार यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता मात्र आता राज्यातील समीकरणे बदलल्याने भारती पवार यांना फटका बसणार का ? अशी चर्चा सध्या रंगली आहे. 


भारती पवारांचा आदिवासी वाद्यांवर ठेका


तर दुसरीकडे भारती पवार मात्र टेन्शनफ्री बघायला मिळतायत. आज कालिदास नाट्यगृहात आयोजित आदिवासी कारीगर मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी डॉ. भारती पवार यांनी आदिवासी कलाकारांसोबत नृत्य करत आदिवासी वाद्यांवर ठेका धरला. 


माझ्या रूपाने पहिल्यांदा महिला खासदार दिंडोरीला लाभली


कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, माझ्या रूपाने पहिल्यांदा महिला खासदार दिंडोरीला लाभली. मी माझे काम जबाबदरीने पार पडत असून आता देखील वरिष्ठ स्थरावर बैठका सुरू आहेत.  कुठलीही अडचण येणार नाही असं म्हणत एकप्रकारे तिकीट मलाच मिळणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


कुठलीही अडचण येणार नाही - डॉ. भारती पवार


राज्यात जागावाटपाबाबत तिढा अजिबात नाही. 11 तारखेच्या बैठकीत चित्र स्पष्ट होईल. अब की बार 400 पार होणार आहे. जे काम मला दिले ते मी जबाबदारीने केले आहे. माझ्या रुपात पहिल्यांदा महिला खासदार दिंडोरीला लाभली आहे. वरिष्ठ स्थरावर बैठका सुरू आहेत. पार्लमेंट्रीची बैठक होईल आणि मग निर्णय होईल, कुठलीही अडचण येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


मला आदेश असेल तर दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक - नरहरी झिरवाळ


दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी गटाला मिळणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. या पदासाठी नरहरी झिरवळ स्वतः इच्छुक आहेत. या मतदारसंघात चार राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने पक्षीय बलाबल पाहता ही जागा राष्ट्रवादीकडेच राहावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी अजित पवार यांना बैठकीत केली आहे. या लोकसभेच्या जागेवर आपण लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे नक्की दिंडोरी लोकसभेची जागा महायुतीत कुणाच्या वाट्याला येणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  


कोण आहेत डॉ. भारती पवार


डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. 2019 साली भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आल्या. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री हे मंत्रिपद देण्यात आले. 


आणखी वाचा 


Bhaskar Jadhav : मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं, माझा हक्क होता; नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया