Nashik Crime News : मैत्री म्हटली की, त्यात चेष्टामस्करी आलीच. मात्र चेष्टामस्करीची मर्यादा ओलांडली की एखादाचा जीव देखील घेऊ शकते, असा एक प्रकार नाशिक शहरात (Nashik News) घडला आहे. थट्टा मस्करी दरम्यान गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रशांत सुनील झिनवाल (19, रा. जुनी स्टेशनवाडी, पवारवाडी, देवळाली कॅम्प) यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 7 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिल्टरेशन प्लांटजवळ मोबाईल खेळत होते. त्यावेळी समोरुन आरोपी सोन्या, मोहीत, सुमित व लवनित हे चौघे जण जात होते. त्यावेळी सुमित आणि लवनित यांच्यामध्ये काही तरी कारणावरुन चेष्टा मस्करी सुरू झाली.
गुप्त भागावर मारला हाताचा कोपरा
त्यात लवनितने सुमितला डोक्यात मारले. त्यानंतर सुमितने लवनितच्या पोटात दोन बुक्के मारुन त्याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर सुमितने लवनितच्या गुप्त भागावर हाताचा कोपरा मारला. त्यात लवनित किरणकुमार भगवाने (15, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) हा जागीच बेशुद्ध झाला. म्हणून मोहीत व सुमित यांनी त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र उपचार सुरू असताना लवनितचा मृत्यू झाला.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी प्रशांत झिनवाल यांनी ही माहिती त्याची मोठी आई संगिता झिनवाल यांना सांगितली. त्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सुमित विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.
जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक
जमिनीची बनावट कागदपत्रे बनवून वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रत्नाबाई उर्फ रत्नमाला भगवान उर्फ भगवंता गांगुर्डे (68, रा. राजीवनगर, गंगापूर-गोवर्धन) यांची व त्यांचा मयत दिर यांच्या नावे जमीन आहे. दरम्यान आरोपी गजराबाई भिमराव गांगुर्डे व विलास विठ्ठल लोखंडे यांनी संगनमत करुन फिर्यादी गांगुर्डे व त्यांच्या मयत दिराच्या नावे असलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्र, संमतीपत्र जनरल मुखत्यारपत्र त्यांच्या नकळत बनवून त्यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रत्नाबाई गांगुर्डे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा