नाशिक : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये दीर आणि भावजयची भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेच्या भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कळवणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांची आज भेट झाली. भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील कौटुंबिक वैर सर्वश्रुत असतानाच निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार आज सकाळी नितीन पवारांच्या घरी भेटीसाठी पोहोचताच राजकीय भूवया उंचावल्या. यावेळी पवार कुटुंबामध्ये बराच वेळ गप्पा देखील रंगल्या.


मतदारसंघात शेतकऱ्यांचा रोष 


कांदा प्रश्नावर मोदी सरकारच्या धोरणांमुळे मंत्री भारती पवारांना मतदारसंघात शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे मंत्री भारती पवार अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे आजच्या या भेटीनंतर दीर भावजय वैर संपुष्टात येणार का? आणि भारती पवारांसाठी दीर नितीन पवार आता मैदानात येऊन युतीधर्म पाळणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. नितीन पवारांची भारती पवारांना मदत मिळाल्यास दिंडोरी लोकसभेतील समीकरण काही प्रमाणात का होईना पण बदलू शकतात, अशी चर्चा आहे. 


ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस


दरम्यान, नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या