नाशिक : राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे आणि याच विभागातील नाशिकच्या (Nashik Crime) सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्याविरोधात दीड लाखांच्या लाच प्रकरणी नाशिक एसीबीने (Nashik ACB) गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज होत. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आळे यांनी 6 मे 2024 रोजी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती. आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचा देखील हिस्सा असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती आळे या सध्या बाळंतिण आहेत, तर तेजस गर्गे यांचा एसीबीकडून शोध घेतला जात आहे. संशयित आरती मृणाल आळे (आरती मृणाल आळे, वय 41 वर्ष, रा. फ्लॅट नंबर 17, ए विंग,अनमोल नयनतारा, रानेनगर, नाशिक ) यांना दीड लाख रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. तेजस गर्गे (डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलणालय विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई रा.इमारत क्र.6 फ्लॅट न.20, लाला कॉलेज जवळ, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ, मुंबई) यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखाना सुरु करण्यासाठी दीड लाखांच्या लाचेची मागणी
तक्रारदाराने कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिकमधील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक एन. बी.सूर्यवंशी, व सुवर्णा हांडोरे यांनी आळे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. यानंतर चौकशीत गर्गे यांचंही नाव समोर आलं त्यांच्याविरूद्धही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या