नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत येणारे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मी माझ्या बहिणींना विनंती करते की, तुम्ही पटकन ते पैसे काढून घ्या. भाजपाचे दोन दोन लोक म्हणत आहेत की पैसे काढून घेऊ. त्यामुळे ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले आहेत त्या भगिंनींनी पैसे काढून घ्या, असे त्यांनी म्हटले. आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दादा भुसे म्हणाले की, 19 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आहे. याच शुभदिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचे बहिणींना पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीपावलीची अॅडव्हान्स भेट महिलांना देण्यात आलीय. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया होत आहे, असे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दादा भुसे म्हणाले की, हा बालिशपणा आहे. महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची त्या थट्टा करत आहेत. सन्मान निधी जाणार आहे याचं काही लोकांना दुःख होत आहे. आज राजकीय बोलायचे नाही. आजचा दिवस चांगला आहे. पण काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते सैरभैर झालेत. त्यामुळे योजनेत खोडे घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रयुत्तर त्यांनी सुप्रिया सुळेंना दिले.
लोकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने काम सुरू
नाशिक मुंबई महामार्गाच्या परिस्थितीवर दादा भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यांनी देखील महामार्गाची पाहणी केली. बऱ्यापैकी कामे झालेली आहे. रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवले जातायत. काही प्रमाणात वाहतूक देखील सुरळीत झाली आहे. कामाची जलद गतीने प्रगती सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने काम सुरू असून त्याचा रिझल्ट दिसून येतोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या