नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच आता माकप पक्षाकडून राज्यातील 12 जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 


भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने शहरातील पक्ष सभासदांची सर्वसाधारण सभा सीटू कामगार भवन येथे पक्षाचे राज्य सेक्रेटरी उदय नारकर, जीवा पांडू गावित, भिका राठोड, डॉ. डी. एल. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका? याविषयी कॉ. उदय नारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात कॉ जे पी गावित यांनी मार्गदर्शन केले. 


माकप महाविकास आघाडीसोबतच 


यावेळी आगामी निवडणूकीत नाशिक पश्चिममधून डॉ.डी.एल.कराड यांनी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनास अंतिम रूपरेषेचे माध्यमातून समारोप केला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत माकपच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडलेली असून, लोकसभेप्रमाणेच आगामी विधान सभेच्या निवडणूकीतही माकप महाविकास आघाडीसोबत काम करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. 


12 जागा लढवण्याचा निर्धार 


निवडणूकीत माकपाचे प्राबल्य असलेल्या राज्यातील 12 जागा लढवण्याचा निर्धार माकपाने या बैठकीत व्यक्त केला असून त्यास शरद पवार (Sharad Pawar), उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole) यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे माकपाचे प्रदेश सेक्रेटरी कॉ. उदय नारकर यांनी यावेळी सांगितले. 


दिंडोरीसह 'या' जागांची मागणी 


माकपाचे प्राबल्य असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण व नाशिक पश्चिम या जागांची मागणी करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या सरकारने जनसामान्यांना देऊ केलेल्या योजना हा निवडणूक स्टंट असून त्या योजना दिर्घकाळ चालू शकणार नाहीत. सरकारचा सुरु असलेला कारभार हा राज्याच्या हिताचा नाही. त्यामुळे लोकसभेप्रमारेच सत्ताधार्‍यांना जनता मोठा जटका देणार असून या विरोधात मविआची वज्रमुठ एक दिलाने काम करणार असल्याचे डॉ. डी.एल. कराड यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पश्चिम मतदारसंघावर या आधीच शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे नाशिक पश्चिमची जागा नक्की  कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


ठाण्यातील राड्यानंतर कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल; मनसैनिकांचा पोलीस स्थानकात जल्लोष


आनंद दिघेंच्या काळापासून सोबत, आता ठाकरेंची साथ का सोडली?; अनिता बिर्जेंनी सांगितले कारण!