नाशिक : गुरुवारपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात झाली आहे. आज सिन्नरमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तहसील कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरल्याचे दिसून आले.


दिंडोरी येथून सुरु झालेली जनसन्मान यात्रा आज आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात धडकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्र्‍यांचा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी अजित पवार गट विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधत आहेत. यानिमित सिन्नरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   


अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले


जनसन्मान यात्रेनिमित्ताने अजित पवार सिन्नर शहरात दाखल होताच त्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कामाची पाहणी करताना एका दरवाजाची अवस्था बघून अजित पवार संतापले आणि त्यांनी 'आम्ही कामाचे पैसे देतो, असे काम अपेक्षित नाही, पुढच्या वेळी मी सिन्नरमध्ये आल्यावर असं चित्र दिसायला नको', असं म्हणत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले. 


कोपरगावात अजित पवारांच्या सभेआधी जोरदार पावसाची हजेरी


दरम्यान, कोपरगावमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहचताच सभास्थळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मात्र धो-धो पावसातही महिला आपल्या डोक्यावर खुर्ची घेऊन बसल्या दिसून आले. आम्हाला पैसे मिळणार आहेत, दादा भेटलाय येणार आहेत. म्हणून आम्ही मागे हटणार नाही, अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. पैसे मिळाले तर दादाला मतदान करणार आहे. पैसे नाही मिळाले तर इतर कोणालाही मतदान करणार, असेही काही महिलांनी म्हटले. 


विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : अजित पवार


दरम्यान, सिन्नर येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील मुलामुलींना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी आता इथे आलो तेव्हा रथात बसलो, लग्नात बसतो तसे बसवले. नववधू आणि नवरदेवाला बसवतात तसे बसलो. आम्ही लग्नात घोड्यावर ही बसलो नव्हतो ते आता पुरे करून घेतले, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली. आजपर्यंत बांधल्या नाही एवढ्या राख्या तीन दिवसांत बांधल्या आहेत. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, आर्थिक शिस्त आम्हाला कळते 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करणे हे येड्या गबळ्याचे काम नाही, असा शब्द अजित पवारांनी उपस्थितांना दिला आहे. 


आणखी वाचा


Ajit Pawar: सिन्नरमध्ये बुलेटवर फिरत असताना अजित पवार म्हणाले, ‘बाईकवर बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय…'