नाशिक : महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांचे मोठे भक्तगण आहेत.  मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमाला जात असतो. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. 


सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि अहमदनगर (Ahmednagar) शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आता यावर छगन भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे


छगन भुजबळ म्हणाले की, संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम या संतांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली आहे. वैष्णवाचे जन वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे अनेक उदाहरणे संतांनी दिले आहे. त्यामुळे आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. महंत रामगिरी महाराज यांचे मोठे भक्तगण आहेत.  मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमाला जात असतो. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. महंत रामगिरी महाराज यांनी कोणाचे मने दुखवू नये. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म कोणीही कोणाचे मन दुखवू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


वादग्रस्त वक्तव्याबाबत काय म्हणाले रामगिरी महाराज?


वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता रामगिरी महाराज म्हणाले की, तेढ निर्माण होण्यासारखे मी काही बोललो नाही. दीड तासांचे प्रवचन होते. त्यातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 


आणखी वाचा 


रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी