Solapur: मागील दोन दिवसांपासून नाशिक, अहमदनगर, वैजापूर शहरांमध्ये रामगिरी महारांच्या वक्तव्याने तणाव निर्माण होऊन आंदोलने झाल्याचे चित्र असताना रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे या मागणीसह त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केलीय. सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.
उद्या कोणी उठलं आणि रामाबद्दल बोलले तर चालेल का..? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोकं चालवून कोम करावं अशी टीका त्यांनी केली आहे.


रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापूर शहरात १५ ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला होता. अहमदनगर, नाशिकच्या येवला आणि मनमाडमध्येही मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरू आहे, म्हणून या महाराष्ट्रात संताच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही' असं वक्तव्य केलं होतं.यावरून आता काँग्रेसचे जेष्ठ माजी खासदार हुसेन दलवाई यांनी  रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे.


काय म्हणाले हुसेन दलवाई?


रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे. उद्या कोणी उठलं आणि रामाच्याबद्दल बोललं तर चालेल का? असा सवाल माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला. ते म्हणाले, धर्माचा आदर करणारा आपला समाज आहे. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, ही देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना संस्कृती बदलायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हलवलं पाहिजे, असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कांही तरी डोकं चालवून काम कराव, असा घणाघात ही यावेळी हुसने दलवाई यांनी केला आहे.


आगामी विधानसभेच्या दृष्टीने राज्यात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं या मागणीसाठी दलवाई राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान नितेश राणे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.


राणे साहेंबांनी त्यांना सांगावं कसं बोलायचं


माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले, तो लहान आहे, त्याचा काहीही अभ्यास नाही. अशा व्यक्तीबद्दल मी न बोललेलेच बरे आहे.  पण राणे साहेबांनी त्यांना सांगायला हवं कसं बोलावं ते. देवेंद्र फडणवीस यांंचं नाव घेऊन तो काहीही बोलतोय. यावर त्यांनीही विचार करावा, असं दलवाई म्हणाले.