नाशिक : वडनेर भैरव (vadner Bhairav) येथून स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी शाळेत सात वर्षीय चिमुकला गेला असता त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. आता या मुलाच्या हत्येनंतर वडनेर भैरवमध्ये बंद पाळण्यात आला आहे. मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे मोलमजुरी करणारे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. सात वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
वडनेर भैरवमध्ये कडकडीत बंद
या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करुन मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सात वर्षीय बालकाच्या हत्येच्या निषेधार्थ वडनेर भैरव ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या