Chhagan Bhujbal नाशिक : जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही. ते आताही शिवसेनेचे आहे म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, असा टोला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना लगावला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पक्षात सध्या तुमची घुसमट सुरु असल्याचा प्रचार सुरु आहे. यावर छगन भुजबळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्षात काय घुसमट आहे? मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेले नाही. मी जे काही करतोय त्याबाबत अजित दादाही म्हणालेत की ते ओबीसींचे काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत.
मला कुठल्या पदाची हौस नाही
अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असे ट्विट केले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, मला अजुन काही माहिती नाही. त्यांना कसे काय माहिती मिळाली. हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला आले नाही, असे ते म्हणाले.
ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, तिथे मी सिनियर प्रोफेसर
संजय गायकवाड यांच्यावर छगन भुजबळ म्हणाले की, मी पण ते ऐकले आणि वाचले. ठीक आहे थोड वाईट वाटलं. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे. त्यामुळे तो आमदारांनादेखील आहे. याबाबत माझ काहीही म्हणणे नाही. परंतु जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही. ते आताही शिवसेनेचे आहे म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, असा टोला त्यांनी यावेळी संजय गायकवाड यांना लगावला.
हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार
भाषा जरा जपून वापरली पाहिजे. त्यांच्या वक्तव्याबाबत आता शिंदे साहेब पाहतील. ते म्हणाले की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला मंत्रीमंडळात बाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. संजय गायकवाड यांना कल्पना आहे की, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि मोदा जोशी आणि इतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेता म्हणून मी काम केलेले आहे.
मनोज जरांगे काहीही करू शकतात
मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलनाला बसणार आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे मोठे नेते आहेत,ते काहीही करू शकतात. काल त्यांनी बजेट मधून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सुचले नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
जितेंद्र आव्हाडांचे आभार
विजय वडेट्टीवार यांच्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींबद्दल सगळेच काम करू शकतात. उद्या आमची मोठी रॅली होईल पुढची दिशा आम्ही जाहीर करू. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटबाबत भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल मी आभारी आहे, त्यांनी माझ्याबद्दल प्रेम दाखवले, असे ते म्हणाले.
अजित दादांना माहीत असेल
झिशान आणि बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांना या बद्दल माहिती असेल.
आणखी वाचा