नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला आलेल्या शिंदेंच्या आगमावेळी हवेत ड्रोन असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली. अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूळ गावातील एका शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आले होते. हे गाव दुर्गम भागात असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. यावेळी शिंदेंना भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केली. त्याचवेळी हवेत एक ड्रोन उडताना दिसत होते.
ड्रोन उडवणाऱ्याला ताब्यात घेतलं
हवेत ड्रोन उडताना लक्षात आल्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. नंतर पोलिसांनी त्या ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. हा व्यक्ती कोण आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या व्यक्तीविषयी माहिती एकनाथ शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांकडून घेतल्याची माहिती आहे.
शिंदेंची स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम
राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून आढावा घेतला जातो. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुममधून आढावा घेतला जाईल. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना वॉर रुमच्या बैठकांप्रमाणे को- ऑर्डिनेशन रुमच्या बैठकांनाही हजर राहावे लागेल. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची ओढाताण होऊ शकते. त्यामुळे एक समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते. परिणामी ही को ऑर्डिनेशन रुम एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ही बातमी वाचा: