Dindori Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) धामधूम सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सध्या जागा वाटपावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. तर स्थानिक पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघांवर दावेदारी सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीकडून (NCP) दावा करण्यात आला आहे. दिंडोरीच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. 


काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची लोकसभा जागा वाटपाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची (Dindori Lok Sabha Constituency) जागा राष्ट्रवादीकडे (NCP) घेण्याची मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे करण्यात आली होती.


दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक - नरहरी झिरवाळ


आज यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 4 आमदार हे अजित पवार गटाचे असल्याने राष्ट्रवादीने या मतदार संघावर दावा केला आहे. मला आदेश असेल तर दिंडोरी लोकभा लढवेल असे त्यांनी म्हटले आहे. 


भारती पवारांचाही दिंडोरी लोकसभेवर दावा


तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांनीही तिकीट मलाच मिळणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. 'माझ्या रूपाने पहिल्यांदा महिला खासदार दिंडोरीला लाभली. मी माझे काम जबाबदरीने पार पडत असून आता देखील वरिष्ठ स्थरावर बैठका सुरू आहेत. कुठलीही अडचण येणार नाही.  वरिष्ठ स्थरावर बैठका सुरू आहेत. पार्लमेंट्रीची बैठक होईल आणि मग निर्णय होईल', असे त्यांनी म्हटले आहे. 


दिंडोरीची जागा नक्की कुणाच्या वाटेला? 


एकीकडे विधानसभा उपाध्यक्ष हे दिंडोरीत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे डॉ. भारती पवार या पुन्हा निवडून येण्याची तयारी करत आहेत. तर भारती पवारांच्या जाऊबाई जयश्री पवार यादेखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. आता महायुतीतून ही जागा नक्की कोणाच्या वाटेला येणार? दिंडोरीच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Ajit Pawar and Eknath Shinde : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, महाशक्तीकडून किती जागा मिळणार?