Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जगाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात रस्सीखेच सुरु असताना आता यात भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती. यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, असे संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक वाढली होती. त्यामुळे गोडसे मुंबईत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर...
आता नाशिक लोकभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असताना भाजपाने उडी घेतली आहे. नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी राजीनाम्याचा देण्याचा इशारा दिला आहे. नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर राजीनामा देणार, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता पुन्हा भाजप आक्रमक भूमिका घेतल्याने नक्की नाशिकची जागा कुणाला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाकडून छगन भुजबळांना विरोध
दरम्यान, नाशिकला छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. सकल मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जात आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. तसेच रस्त्यांवर भुजबळांच्या विरोधात होर्डींग्स लावण्यात आले आहेत. भुजबळांविरोधात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या