Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र सर्वांचेच लक्ष असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने नाशिकच्या जागेवरून अद्यापही सस्पेन्स कायम आहे. 


हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघावर सलग दोन टर्म खासदार असून यंदाही ते इच्छुक आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसेच असतील, अशी घोषणा केली होती. श्रीकांत शिंदे यांनी घोषणा करूनदेखील हेमंत गोडसेंच्या नावाचा पहिल्या यादीत समावेश नसल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. 


गोडसेंचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन 


नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तर भाजपदेखील या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी तडकाफडकी मुंबई गाठली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसे यांनी शिवसैनिकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची उमेदवारी गोडसे यांनाच मिळेल, असे आश्वासन दिले होते. 


नाशिक जागेबाबत गोडसेंना दुसऱ्यांदा आश्वासन


त्यानंतर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याबदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी काल पुन्हा एकदा मुंबई गाठली आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कालदेखील हेमंत गोडसेंना नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार, असे दुसऱ्यांदा आश्वासन देण्यात आले. गोडसेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठकदेखील झाली. या बैठकीत काय ठरले? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. 


नाशिकची जागा नक्की कुणाला सुटणार?


आज हेमंत गोडसे शिवसैनिकांसह पुन्हा एकदा मुंबईत धडकले असून ते नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेच्या पहिल्या यादीत हेमंत गोडसेंचे नाव आले नसल्याने शिवसैनिकांची धाकधूक वाढली आहे. आता नाशिकची जागा नक्की कुणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, हिंगोलीतून पुन्हा हेमंत पाटील, तर मुंबईतून राहुल शेवाळेंसह आठ उमेदवारांची घोषणा