Hemant Godse : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसेच (Hemant Godse) असतील, अशी घोषणा नाशिक येथे झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) मेळाव्यात केली होती. यानंतर भाजपाकडून (BJP) श्रीकांत शिंदेंच्या घोषणेचा कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर भाजप-शिवसेना वादात राष्ट्रवादी अजित पवार गटानेही (NCP Ajit Pawar) उडी मारत नाशिकच्या जागेवर दावा केला. 


यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील. या बदल्यात नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांची वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे. 


हेमंत गोडसेंची पुन्हा मुंबईवारी


या पार्श्वभूमीवर नाशिकचे सलग दोन टर्मचे खासदार हेमंत गोडसे हे आता पुन्हा एकदा मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले आहेत. गोडसे आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत. काल रात्री नाशिकच्या शिवसैनिकांसह गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गोडसेंना दिले होते. 


मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाशिकच्या जागेवरून चर्चा


हेमंत गोडसेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात एक बैठक झाली. मात्र त्या बैठकीत नेमकं काय ठरलं ते अद्याप गुलदस्त्यात आहे. आता नाशिकची जागा मिळविण्यासाठी गोडसे पुन्हा एका मुख्यमंत्रीच्या दारी गेले आहेत. छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याचे कळताच शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले.


शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकला राजाभाऊ वाजेंना उमेदवारी


दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. यामुळे ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर हे नाराज असल्याचे दिसून येत आहे. आता नाशिकला राजभाऊ वाजे विरुद्ध महायुतीतून नक्की कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार


नाशिकच्या जागेवरुन महायुतीत खडाजंगी, कोणाच्या मर्जीसाठी जागा सोडणार नाही, भुजबळांना शिंदेंच्या शिवसेनेचा थेट इशारा