Dindori Lok Sabha Constituency : नाशिकच्या दिंडोरीमध्ये सध्या राजकारण चांगलंच तापल्याच बघायला मिळतय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित होताच भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) आक्रमक झाले असून धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल, असे म्हणत त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलय. यासोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखील मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत, कांदा प्रश्नावर त्या तोडगा काढू शकल्या नाहीत, असा आरोप भास्कर भगरेंनी केलाय.
भास्कर भगरे यांच्या आरोपाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणून जेवढा निधी मागच्या ७० वर्षात आला नसेल तेवढा माझ्या कार्यकाळात मी आणला असून कागदावर चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे, असं भारती पवारांनी म्हटलंय. यासोबतच उमेदवारी जाहीर होताच त्यांनीच धनशक्ती जमा करायला सुरुवात केल्याचाही पलटवार पवार यांनी भगरेंवर केला आहे. आधीच्या सरकारने आणि आताचे सरकारने कांदा प्रश्नावर काय काय केले ते बघा, कांद्याबाबत फक्त राजकारण करू नका या शब्दात त्यांनी भास्कर भगरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर आहे. धनशक्ती ते म्हणतात मात्र मी ऐकले की उमेदवारी जाहीर होताच त्यांनीच धनशक्ती जमा करायला सुरुवात केली आहे. जनतेत जाऊन विकासाच्या मुद्द्यावर लोकशाही मार्गाने ही निवडणूक आपण लढली पाहिजे. धनशक्ती उल्लेख करण्यापेक्षा जनतेच्या अकाउंटमध्ये जनधन योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी किती निधी दिला हे देखिल बघणं महत्वाचं आहे. मोदीजींवर देशाचा आणि माझ्या मतदारसंघाचा विश्वास आहे.
मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार
आरोग्यमंत्री म्हणून जेवढा निधी मागच्या ७० वर्षात आला नसेल तेवढा माझ्या कार्यकाळात आणला, मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. आरोप करण्यापेक्षा तथ्यांवर बोला, ही लढाई टिकेवर बोलण्याची नाही. तथ्यांवर, रिपोर्टवर, डेटावर बोलण्याची लढाई आहे. आम्ही आमचा रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेसमोर जातो आहोत. माझ्या जिल्ह्याला आरोग्य सुविधा बळकट करण्याचे काम आम्ही केले आहे. भगरेंनी हा रिव्ह्यू बघितला नसावा, नुसता आरोप करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
कांद्याला अनुदान देणारं पहिलं सरकार
मी खासदार झाल्या झाल्या कांद्याची निर्यातबंदी खुली केली होती. कांद्याचा भाव कमी झाला की, मी देखील वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, त्या माध्यमातून नाफेडची खरेदी सुरु केली. आधीच्या सरकारनेच निर्यातबंदी केली होती, त्यावर पण बोलले पाहिजे. आधीच्या सरकारने आणि आताचे सरकारने केलेलं काम बघितले पाहिजे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. आमच्या राज्य सरकारने कांद्याला अनुदान दिले, हे पहिले सरकार होते. ७० वर्षात कोणीही हा निर्णय का घेतला नाही? कांद्याबाबत फक्त राजकारण करू नये, आम्ही राजकारण नाही समाजकारण करतोय, शेतकऱ्यांशी बांधीलकी असलेली मी कन्या आहे. मी पण शेतकरी घराण्यातीलच आहे. निर्यात खुली करा हे मी पण म्हणते. काही देशात निर्यात खुली करण्यात आली आहे. आम्ही प्रयत्न करतोय, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा