Bacchu Kadu नाशिक : शेतकऱ्यांच्या सोयीचं आम्ही राजकारण करू. भाजपला लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला (Lok Sabha Election 2024) आम्ही भाजप सोबत राहू, असा इशारा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


बच्चू कडू म्हणाले की, मी या सगळ्या जातीपातींबाबत शिवजयंतीनंतर बोलेल. 20 तारखेला याबाबत मी प्रेस घेणार आहे. भुजबळ आणि आरक्षण यावर काय बोलायचे हे ठरविले आहे. सगळ्या समाजाला विनंती करतोय की, माझ्यासहित सर्व नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आता निवडणूका आहे, धर्म आणि जातीची लढाई मी पाहतोय. हक्काची लढाई मागे राहत आहे. एका ताटात जेवणारे लोक, ताट हिसकाऊ लागले आहेत.  


भुजबळ-जरांगेंबाबत 20 तारखेला बोलणार  


समाजात वाईट होऊ नये, या विचाराचा मी आहे. दोन समाजात वाद होईल, असं कधी बच्चू कडू बोलणार नाही. शिवजयंतीनंतर आम्हीही पत्रकार परिषद घेतोय. अठरा पगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलं आहे. नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही. समाज आम्हाला ताकद देईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेल, असे ते म्हणाले.  


बंदूक देशासाठी काढा, स्वतःसाठी नाही


उल्हासनगर गोळीबाराबाबत बच्चू कडू म्हणाले की, बंदूक देशासाठी काढा, स्वतःसाठी नाही, स्वहितासाठी नाही. स्वतःला गोळी मारून घ्या. शेतकऱ्यांसाठी कष्टकरांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते, असे ते म्हणाले.


मीडियावर मागणी करून गुन्हे दाखल होत नाही


खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर बच्चू कडू म्हणाले की, हे राजकारण आहे. त्याला काही अर्थ नाही. संजय राऊत यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले. याबाबत बच्चू कडू म्हणाले की, मीडियावर मागणी करून गुन्हे दाखल होत नाही. त्यांनी लेखी पत्र द्यायला पाहिजे होते. त्यांचे आमदार, खासदार आहे. त्यांनी विधानसभेत लोकसभेत प्रश्न मांडावे. 


आम्ही विधानसभेचा दावा करतोय


शेतकऱ्यांच्या सोयीचं आम्ही राजकारण करू. भाजपला लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू. नाहीतर आम्ही जळगाव, अमरावती या ठिकाणी निवडणुका लढू. आम्ही लोकसभेचा दावा करत नाही. विधानसभेचा दावा करत आहोत. आता निश्चित झालं तरच आम्ही लोकसभेला काम करू. प्रहार हाच आमचा कोटा आम्हाला दुसऱ्याच्या कोट्यात जायची गरज नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही जानकर, शेट्टी साहेबांसोबत मिटींग लावत आहोत, असेही ते म्हणाले. 


माझ्या सारख्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही


प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे. हे मी सांगू शकणार नाही. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे मला माहीत नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. माझ्या सारख्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. नितेश राणे यांनी आपला बॉस सागर बंगल्यावर आहे. असे विधान केले यावर बच्चू कडू म्हणाले की, राणेंची जशी भाषा आहे जशी ठाकरे भाषा, तशी ठाकरेंची भाषा होती. त्यांना गांभीर्याने नाही घेतले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.


आणखी वाचा 


Uddhav Thacekray : पण मला कुठं माहिती तिकडं कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर बोचरा वार