Ajit Pawar नाशिक : मी काही लेचापेचा नाही. जी वस्तू स्थिती आहे ते मी बोलणार आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी व्यक्ती मी नाही. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे.  ८० वर्षाच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असे वक्तव्य गुरुवारी अजित पवारांनी नाशकात केले आहे. 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुविचार मंच आयोजित चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी वरील वक्तव्य केले आहे. 


सुविचार मंचचे कार्य कौतुकास्पद


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने अनेक संस्था काम करतात. त्यादृष्टीने नाशिकमध्ये सुविचार मंच ही संस्था काम करत आहे. या सुविचार मंचचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन संस्था काम करते आहे. त्याबद्दल सर्व टीमचे त्यांनी अभिनंदन केले. 


सुविचार गौरव काम करतेय याचा विशेष आनंद


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जगात आणि देशात अविचाराचे वातावरण असताना सुविचार गौरव काम करतेय याचा विशेष आनंद आहे. विशेष म्हणजे आकाश पगार आणि त्यांच्या युवकांची टीम नाशिकच्या गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करताय त्यांचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच नाशिकचे नाशिकपण टिकविण्यासाठी अनेक संस्था नाशिकमध्ये काम करताय त्यांचे सर्वांचे अभिनंदन.


पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना काम करण्यास अधिक स्फूर्ती मिळते


आपले काम करतांना नाउमेद न होता सकारात्मकतेने काम करत राहणे आवश्यक आहे. समाजातील कर्तृत्ववान लोकांना समाजासमोर आणून त्यांचा सन्मान करण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना काम करण्यास अधिक स्फूर्ती मिळत असते. त्यातून समाजाच्या विकासासाठी मोठी मदत मिळते. तसेच आपल्या अंगात कला गुण असतील तर त्याला हेरनारे लोक समाजात असतात. त्यातून अनेकांना मोठी संधी मिळते, असे मंत्री भुजबळांनी सांगितले. 


पुरस्कार सोहळ्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बनकर,आ. दिलिप बोरसे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विष्णुपंत म्हैसधुणे, लक्ष्मण सावजी, राजेंद्र डोखळे,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,डॉ. स्वप्नील तोरणे, प्रा. विनोद गोरवाडकर,प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सुविचार मंचचे ऍड. रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


यांचा झाला गौरव


जीवन गौरव - पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर 
कला - अभिनेते गौरव चोपडा
विशेष पुरस्कार - अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी 
सामाजिक - रामचंद्रबापू पाटील
वैद्यकीय - डॉ. भाऊसाहेब मोरे  
शैक्षणिक - डॉ. शेफाली भुजबळ 
साहित्य - दत्ता पाटील
उद्योग - चंद्रशेखर सिंग 
कृषी - संगीता बोरस्ते 
सहकार - प्रा. नानासाहेब दाते  
क्रीडा - गौरी घाटोळ


इतर महत्वाच्या बातम्या


Jitendra Awhad : आव्हाडांना डोक्याचा 'नारू' झालाय; मनसे नेते प्रकाश महाजनांची जहरी टीका